यांना घरचेही मत देणार नाहीत

udayan raje bhosle

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे भोसले यांनी हिंमत होती तर माझ्याविरोधात लढायचं होते अशी टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली आहे. तसेच श्रीनिवास पाटील यांचा दोन लाखांहून जास्त मतांनी विजय होईल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. यावर बोलताना उदयनराजेंनी दोन-दोन लाथा घालून लोक यांना बाहेर काढणार आहेत, अशी बोचरी टीका केली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी काही कामे केली नसल्याचा आरोप यावेळी उदयनराजेंनी केला. मी दोन लाख मतांनी पराभूत होणार म्हणतात, पण लोक यांना दोन-दोन लाथा घालून बाहेर काढणार आहेत. साधे कराड शहरासाठी काही केले नाही. आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होत्या. पण त्यांनी कामं केली नाहीत, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. यांना घरच्यांची मतंही मिळणार नाहीत, सगळे नाराज आहेत असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.उदयनराजे यांनी म्हटलं आहे की, पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढू नये यासाठी मी काही दबाव टाकला नाही. आपल्याकडे लोकशाही आहे.

इतकी हिंमत होती तर लढायचं होतं. उगाच फॉर्म नाही भरला आणि आता चूक केली असं बोलणं चुकीचं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, त्यांनादेखील अंदाज आला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून अपेक्षा होती. माझ्यासोबत असणार्‍यांनी त्यांना मतदान केलं म्हणून निवडून आले होते. नाहीतर मागच्या वेळीच यांचा पराभव झाला असता.