घरमुंबईमनसे, वंचितच्या प्रवेशाने शिवसेनेचा कस

मनसे, वंचितच्या प्रवेशाने शिवसेनेचा कस

Subscribe

विक्रोळी विधानसभा मतदारसंघ

मनसेच्या स्थापनेपासून त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणार्‍या विक्रोळी विधानसभा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांच्या कार्यामुळे एकतर्फी समजली जाणारी ही निवडणूक मनसे व वंचित प्रवेश आणि राष्ट्रवादीच्या धनंजय पिसाळ यांनी सुरू केलेल्या जोरदार प्रचारामुळे चुरशीची ठरणार आहे. त्यामुळे सुनील राऊत यांच्यासाठी सोपा समजला जाणारा हा पेपर मात्र आता त्यांचा कस पणाला लावणारा ठरणार आहे.

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळी मतदारसंघ खेचून आणत शिवसेनेचे वर्चस्वही प्रस्थापित केले. परंतु, यावेळी या मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारासह मनसेही तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांनी महिन्याभरापूर्वीच प्रचाराला सुरूवात केल्याने सुनील राऊत यांच्यासाठी सोपा समजला जाणारा हा पेपर मात्र आता त्यांचा कस पणाला लावणारा ठरणार आहे. सुनील राऊत यांना मनसे व वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादीकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

मराठीबहुल असलेल्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघात 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मंगेश सांगळे यांनी आघाडीच्या उमेदवार पल्लवी पाटील व शिवसेनेचे माजी महापौर दत्ता दळवी यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत या मतदारसंघात मनसेचे वर्चस्व दिसून आले. परंतु, मनसेला आपले वर्चस्व फार काळ टिकवता आले नाही. मंगेश सांगळे यांनी नागरिकांच्या कामाकडे केलेले दुर्लक्ष आणि त्यानंतर केलेला भाजप प्रवेश यामुळे मनसेला या भागात मोठे खिंडार पडले.

सांगळे नागरिकांची कामे करण्यात अपुरे पडल्याचा फायदा घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी 2014 मध्ये मनसेचा पराभव करत शिवसेनेला जोरदार विजय मिळवून दिला. त्यामुळे 2019 ची निवडणूक ही सुनील राऊत यांच्यासाठी सोपी असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात होती. परंतु यावेळी या मतदारसंघातून मनसेकडून तगडा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली असून, वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

- Advertisement -

विक्रोळी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आंबेडकरी जनता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या सभेला झालेली गर्दी व या मतदारसंघातून वंचितच्या उमेदवाराला झालेले मतदान पाहता हा समाज या निवडणुकीतही आपली कमाल दाखवण्याची शक्यता आहे. आपल्या समाजाची व्होटबँकच्या बळावर या मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी वंचितकडून जोरदार तयारी सुरू केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही या मतदारसंघातून चांगला उमेदवार देण्याचा निर्णय घेत वंचितकडून सिद्धार्थ मोकळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मोकळे हे पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता असून ते पत्रकार राहिलेले आहेत. लोकसभेचा अनुभव पाहता मोकळे शिवसेनेसमोर आव्हान निर्माण करण्याची शक्यता आहे. त्याच जोडीला मनसेकडूनही आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. फेसबुकच्या माध्यमातून व आपल्या बेधडक कृत्यामुळे तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले नितीन नांदगावकर किंवा आपल्या कार्याच्या उंचीने जनमानसात आपली उंची वाढवणारे वामनमूर्ती जयंत दांडेकर यांना निवडणुकीत उभे करण्याची चर्चा आहे.

त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी संजय दिना पाटील यांना बाजूला सारत पालिकेत राष्ट्रवादीचे माजी गटनेता असलेले धनंजय पिसाळ यांना उमेदवारी दिली आहे. धनंजय पिसाळ हे आपल्या कार्यामुळे कांजूरमार्ग परिसरात नागरिकांच्या चांगल्याच परिचयाचे आहेत. पिसाळ यांनी निवडणुका जाहीर होण्याच्या महिन्याभरापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेत प्रचाराची आखणी केली आहे. मनसे, वंचित व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झालेल्या जोरदार तयारीमुळे सुनील राऊत यांच्यासमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे राऊत व पर्यायाने शिवसेनेसाठी सोपा असणारा हा पेपर कस लावणारा ठरण्याची शक्यता आहे.

विक्रोळी मतदारसंघातील समस्या
पालिका हॉस्पिटल, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, 13 इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, 44 वर्षापासून रखडलेली दफनभूमी, डंपिंग ग्राऊंड, कन्नमवार व टागोर नगरमधील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास, ट्रान्झिस्ट कॅम्पमधील रहिवाशांचे पुनर्वसन.

मतदारांची संख्या
पुरुष -1,36,992
महिला -1,17,838
एकूण मतदार -2,54,830

विधानसभा निवडणूक 2014 निकाल
1) सुनील राऊत, शिवसेना -50,302
2) मंगेश सांगळे, मनसे -24,963
3) संजय दीना पाटील, राष्ट्रवादी -20,233
4) संदेश म्हात्रे, काँग्रेस -18,046
5) विवेक पंडित, रिपाइं -6975
6) नोटा – 3251
मतदानाची टक्केवारी – 51.62 टक्के

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -