निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ नेत्यांचे बनावट व्हिडिओ समोर येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला. नंतर तो फेक असल्याचे उघड झाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा खोटा व्हिडिओ बनवल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी नोएडा एसटीएफने एकाला अटक केली.

ही लोकसभा निवडणूक प्रमुख पक्षांच्या दृष्टीने फारच महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू आहे.

प्रचारासोबतच राजकीय पक्ष सोशल मीडिया, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करत आहे. यामुळेच ही निवडणूक देशातील पहिली AI निवडणूक म्हणून ओळखली जात असावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डीप फेक व्हिडीओवर टीका केली आहे. व्हिडीओत खोटे आवाज काढून नेत्यांच्या तोंडी चुकीची वाक्ये टाकली जात आहेत. यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याचा धोका आहे.

केवळ राजकीय नेतेच नाहीत तर बॉलीवूड कलाकारांना देखील डीप फेक व्हिडीओचा फटका बसला आहे. 

पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर अभिनेता आमिर खान याचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात तो काँग्रेसचा प्रचार करताना दिसतो आहे. 

अभिनेता रणवीर सिंहदेखील डीपफेक तंत्रज्ञानाचा बळी ठरला. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतानाचा त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

नुकतेच बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना, आलिया भट्ट, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक प्रसिद्ध लोकांचे डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.

डीप फेक व्हिडीओ टेक्नॉलाजी म्हणजे हुबेहुब, बारीक सारीक तपशीलांचा विचार करून चुकीच्या पध्दतीने बनवलेले व्हिडीओ.