Tuesday, May 14, 2024
घरमानिनीReligiousवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पैं दृष्टादृष्टाचिये जोडी । लागीं भांडवल न सुटे कवडी । जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥
हे पाहा प्रत्यक्ष अथवा परलोकी होणार्‍या लाभाच्या प्राप्तीकरिता जे एक कवडीही खर्च करीत नाहीत, ते सर्व प्रकारे हानी होणार्‍या ठिकाणी कोट्यवधी द्रव्य खर्च करितात!
जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवाईं पडिला सापें । जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥
जो प्रस्तुत काली पुष्कळ विषयसुखात गुंततो, त्याला सुखी असे मानितात व लोभग्रस्त आहे त्याला ज्ञानी असे म्हणतात.
जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय । तयाचे नमस्कारिती पाय । वडील म्हणुनी ॥
ज्याचे आयुष्य थोडे राहिले आहे व ज्याची शक्ती व बुद्धि कमी झाली आहे, त्याला ‘वडील, श्रेष्ठ, आजोबा’ म्हणून पाया पडतात.
जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजे नाचती कोडें । आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥
लहान मूल जो जो मोठे होते तो तो संतोष मानून कौतुकाने नाचतात, परंतु त्याचे आयुष्य उलट कमी झाल्याबद्दल त्यांना दुःख होत नाही.
जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचेंचि ऐसें । कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥
जन्मापासून दिवसानुदिवस काळाच्याच स्वाधीन होत असतो, परंतु आनंदाने वाढदिवस करून गुढ्या उभारतात.
अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती । परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥
अरे, ‘मर’ हा शब्ददेखील सहन होत नाही आणि मेल्यावर तर रडतातच! परंतु असलेले आयुष्य संपत चालले आहे, याची मूर्खपणाने पर्वाही करीत नाहीत.
दर्दूर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेंटाळी जिभा । तैसें प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥
काय चमत्कार सांगावा, बेडकाला साप गिळीत असतासुद्धा मरणाची कल्पना मनात न आणिता तो पुनः जिभेने माशा धरून गिळीत असतो, त्याप्रमाणे हे प्राणी कोणत्या लाभाकरिता आपली इच्छा वाढवीत असतात कोण जाणे!

- Advertisment -

Manini