वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

पैं आघवाचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळीं । लेइला मोतियांची कडियाळीं । आवडे तैसा ॥
सर्व रोमरंध्रातून निर्मळ घामाचे बारीक कण उद्भवल्यामुळे मोत्यांची जाळीच घातली आहे की काय असे वाटले.
ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हो पाहें जीवदशे । तेथें निरोपिलें व्यासें । तें नेदीच हों ॥
या महासुखाच्या प्रेमाने जीवदशा नाहीशी झाल्यामुळे व्यासांनी सोपविलेले काम करिनासा झाला.
आणिक श्रीकृष्णाचें बोलणें । घो करी आले श्रवणें । कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥
इतक्यात श्रीकृष्णार्जुनाचा संवाद घो घो करीत येऊन कानी पडताच त्या बोलण्याने संजयाच्या देहस्थितीचा वाफसा केला. (तो भानावर येऊन आपल्याकडे सोपविलेले काम करण्यास तयार झाला.)
तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी । तेवींचि अवधारा म्हणे होजी । धृतराष्ट्रातें ॥
मग लागलीच डोळ्यांचे पाणी व सर्वांगाचा घाम पुसून धृतराष्ट्राला म्हणाला,‘महाराज ऐका.’
आतां श्रीकृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा बिवडु । म्हणौनि श्रोतयां होईल सुरवाडु । प्रमेय पिकाचा ॥
आतां श्रीकृष्णवाक्यरूप उत्तम बीजास संजयाच्या सात्विकतेचा बिवड (पहिले पीक काढल्यानंतर दुसर्‍या पिकास तयार होणार्‍या जमिनीस बिवड म्हणतात.) म्हणजे पूर्वार्धाच्या ज्ञानाचे पीक संजयाच्या अंतःकरणात आलेच आहे; आता उत्तरार्धातील ज्ञानाचे पीक होण्यास संजयाच्या अंतःकरणाची तयारी आहे व त्यामुळे श्रोत्यानाही सिद्धांतरूप पिकाचा सुकाळ होईल.
अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावें । बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥
अहो किंचित अवधान द्याल, तर आनंदरूप राशीवर बसाल, कारण श्रवणेंद्रियास दैवाने माळ घातली आहे.
म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो । तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥
म्हणून ईश्वरविभूतीची जी स्थळे आहेत ती सर्व सिद्धांचे राजे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनास दाखवितील. निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, ती कथा ऐका.

First Published on: May 2, 2024 3:00 AM
Exit mobile version