10-12 वीच्या परीक्षा मे महिनाअखेरीस

शिक्षण सेवक पदभरती प्रक्रिया सुरू - शिक्षणमंत्र्यांची टि्वटरद्वारे घोषणा

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. मात्र, आगामी दिवाळीनंतर त्या सुरू होतील आणि त्यानंतरचा अभ्यासक्रम लक्षात घेऊन दहावी आणि बारावीच्या परीक्षा या मे महिन्याच्या अखेरीस घेतल्या जातील, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘आपलं महानगर’ ला दिली.

देशभरात कोरोना संकटामुळे शाळा बंदच आहेत. याशिवाय सार्वजनिक वाहतूक आणि मंदिरेही अद्याप उघडलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यात पहिल्या वर्गापासूनच्या शाळा केव्हा सुरू करायच्या यासंदर्भात कुठलाही निर्णय घेता आलेला नाही. मात्र, आगामी दिवाळीनंतर नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिल्या आहेत. त्यानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवताना वर्गातील पत आणि बसण्याची जागा विचारात घेतले जातील. जागेची अडचण भासली तर दोन सत्रात शाळा भरवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. मात्र, कोरोनाची भीती कायम असल्याने लहान मुलांचे वर्ग भरवण्यासंदर्भात कुठलाही निर्णय सध्यातरी घेतला जाऊ शकत नाही, असे प्राध्यापक गायकवाड यांनी स्पष्ट केले.

First Published on: November 6, 2020 6:32 AM
Exit mobile version