मुलुंड कोविड रुग्णालयासाठी जमीन खरेदीत 12 हजार कोटींचा घोटाळा

मुलुंड कोविड रुग्णालयासाठी जमीन खरेदीत 12 हजार कोटींचा घोटाळा

मुलुंड येथे ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे पाहून त्यावर योग्य ती कार्यवाही करू, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्याला सांगितल्याचे सोमय्या यांनी नमूद केले.

सोमैय्या यांनी शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले. या निवेदनात सोमय्या यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना मुंबईत ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने २२ एकर जागा अधिग्रहित करण्याचे आदेश दिले. हे आदेश देताना कोणत्याही पातळीवर चर्चा झाली नव्हती, रुग्णालय उभारण्याबाबतचा आवश्यक तो अहवालही तयार करण्यात आला नव्हता.

राज्य सरकारकडे आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा नसल्याने कोविड उपचारासाठी अन्यत्र उभी केलेली जम्बो केंद्र खासगी डॉक्टरांकडे हस्तांतरित केली आहेत.असे असताना ५ हजार खाटांचे रुग्णालय चालविणे राज्य सरकार आणि महापालिकेला शक्य होणार आहे का, याचा विचार न करताच रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला गेला आहे. हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद आहे. हा घोटाळा १२ हजार कोटींचा असावा, असा संशय आहे. या रुग्णालयाच्या उभारणीचा खर्च मुंबईकरांनी भरलेल्या कराच्या रकमेतून होणार आहे. मुंबईकरांनी हा भुर्दंड का सोसावा? असा प्रश्नही सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

किरीट सोमय्या यांच्याकडे सध्या आरोप करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. आमचे सोडाच पण त्यांचा पक्षही त्यांना गंभीरपणे घेत नाही. भाजपने प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये.
-किरीट सोमय्या, ज्येष्ठ नेते, भाजप.

First Published on: October 31, 2020 6:21 AM
Exit mobile version