Leopard attack : कर्जतमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ बकऱ्या ठार

Leopard attack : कर्जतमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ४ बकऱ्या ठार

संग्रहित छायाचित्र

बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ४ बकर्‍या ठार झाल्या असून, ही घटना कर्जत तालुक्यातील खांडस येथे शनिवारी पहाटे २ वाजता घडली. पूर्व वन परिक्षेत्र हद्दीत शरद बाळकृष्ण कटके राहतात. त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून बकर्‍याचे पालन केले आहे. रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी घरालगतच्या बेड्यात आपल्या चारही बकर्‍या बांधल्या होत्या. पहाटेच्या सुमारास बिबट्याने बेड्यात शिरून या बकर्‍यांवर जोरदार हल्ला चढवला. मानेचा लचका तोडल्याने त्या जागीच मृत पावल्या. बकर्‍यांच्या आवाजाने कटके घराबाहेर आले. मात्र तोपर्यंत बिबट्याने चाहूल लागताच जंगलात पलायन केले होते. ही बाब त्वरित वन खात्याला कळविण्यात आली. घटनेची खबर मिळताच वन खात्याचे अधिकारी, कर्मचारी खांडस येथे पोहोचले. पाहणी केली असता बिबट्याच्या हल्ल्यात बकर्‍या मृत पावल्याचे निदर्शनास आले. कशेळे येथील पशु वैद्यकीय अधिकार्‍यांनी बकर्‍यांचे शवविच्छेदन केले. वन अधिकार्‍यांनी पंचनामा केला आहे.

गावाचे सरपंच, पोलीस पाटील यांना भेटून दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. ग्रामस्थांनी सायंकाळी एकटे घराबाहेर पडू नका. घराबाहेरील लाईट सुरू ठेवा. बिबट्या आदी वन्य प्राण्याचा वावर जाणवल्यास फटाके फोडावे अथवा भांड्यांचा आवाज करावा जेणेकरून आवाजाला भिऊन प्राणी पळून जाईल.
-प्रदीप चव्हाण, वन क्षेत्रपाल, कर्जत

या पूर्वीही खांडस बेलाचीवाडी येथे जंगलात चरण्यास गेलेल्या एका गायीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला होता. माथेरान पायथा जंगल परिसरातही काही वर्षांपूर्वी बिबट्याने म्हशीवर हल्ला केला होता, त्यात तिचा मृत्यू झाला. तर अंभेर पाडा ग्रामपंचायत हद्दीतील बेलाची वाडी येथेही दोन बिबट्यांनी एकाच रात्रीत १२ शेळ्या आणि गायीचा फडशा पाडला होता. त्यामुळे तालुक्यात बिबट्यांचा वावर असल्याचे नेहमीच विविध घटनांवरून निदर्शनास येत आहे.

बिबट्यांची शिकार

मागील काळात तालुक्यात बिबट्यांची शिकार केल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या असून, आरोपीना अटक झाली आहे. वदप येथे रानडुकरसाठी लावलेल्या फासात बिबटया अडकून मरण पावला होता. माथेरानमध्येही काही वर्षांपूर्वी झाडावर बिबट्या दिसून आला होता

ग्रामस्थांमध्ये बिबट्याची दहशत

बकर्‍यांवर झालेल्या हल्ल्यामुळे ग्रामीण भागात दहशत पसरली आहे. बहुतेक आदिवासी, शेतकरी बकर्‍या, कोंबड्या पाळतात. त्यामुळे त्यांच्या वासावर येऊन बिबटे पुन्हा हल्ला करू शकतात. यामध्ये मानवी जीवालाही धोका पोहचू शकतो.

बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले…

जंगलात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. जंगलतोड होत आहे. बेकायदा फार्म हाऊस, वन परिक्षेत्रात घरेसुद्धा बांधली जात आहेत. यापूर्वी जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शिकार केली जात असे. रानडुक्कर, ससे आणि वन्य प्राण्यांची शिकार झाल्याने बिबट्यांना जंगलात भक्ष्य मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने भक्ष्याच्या शोधात ते गाव, वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांना आपले लक्ष्य करीत आहेत.


हे ही वाचा – संतापजनक! तू मोठी झाली आहेस का ? विचारत पित्याचा मुलीवर बलात्कार


 

ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी ‘माय महानगर’चे Android App डाऊनलोड करा

First Published on: October 17, 2021 6:24 PM
Exit mobile version