‘आपलं महानगर’ इम्पॅक्ट; चांदेपट्टी ग्रामस्थांचे होणार पुनर्वसन

‘आपलं महानगर’ इम्पॅक्ट; चांदेपट्टी ग्रामस्थांचे होणार पुनर्वसन

‘आपलं महानगर’ इम्पॅक्ट; चांदेपट्टी ग्रामस्थांचे होणार पुनर्वसन

तळीये दरड दुर्घटनेनंतर ठिकठिकाणच्या धोकादायक दरडींचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तालुक्याच्या पूर्व भागातील चांदेपट्टी येथील नागरिक भूस्खलनाच्या शक्यतेमुळे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. जोरदार पाऊस पडल्यास तळीयेची पुनरावृत्ती नाकारता येत नसल्याने शासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यातआली होती. या गावाला दरड आणि भूस्खलनाचा धोका असल्याची बातमी दैनिक ‘आपलं महानगर’ने १० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती. याची तात्काळ दखल प्रशासनाने घेतली आहे. तालुक्यातील चांदेपट्टी ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ. अरुणा जगताप यांनी दिली.

चांदेपट्टी गावातील डोंगरानजिक असलेल्या ९ ते १० घरांतील ग्रामस्थांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करावे लागणार आहे. गावाचा जिऑलॉजिकल सर्वे करण्यात येणार आहे. अहवालानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या दुर्गम भागातील ग्रामस्थांवर दरड आणि भूस्खलनाची टांगती तलवार असल्याने ७० कुटुंबांतील सुमारे ४०० ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत आहेत. या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांत यांना निवेदन देऊन पुनर्वसनाची मागणी केली होती. मात्र तरीही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने भीतीचे सावट गडद होत गेले.

यामुळे गावाला भूस्खलनाचा धोका 

गावाच्या पश्चिमेला डोंगर आणि पूर्वेला दरी आहे. चांदेपट्टी गाव सह्याद्रीच्या रांगेत असल्याने ३ महिने जोरदार पाऊस पडत असतो.त्यामुळे गावामध्ये माती आणि दगड वाहून येतात. त्यामुळे गावाला भूस्खलनाचा आणि दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. २००५ मध्ये गावाला असलेल्या डोंगराला तडे गेले होते. त्यामुळे संपूर्ण गावाचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र अजूनही गावाचे पुनर्वसन केले नाही. गेल्या ३० वर्षापासून बॉक्साईट खडक उत्खननाचे काम चालू असल्यामुळे जमिनीची धूप झाली आहे. त्यामुळे डोंगराला तडे गेले आहेत. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पुनवर्सन विभाग, गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

तळीयेची पुनरावृत्ती पुन्हा नको…

पेण तालुक्यातील पूर्व विभागातील महलमिऱ्या डोंगर ग्रामपंचायत हद्दीमधील चांदेपट्टी हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे. गावातील अनेक कुटुंबे कामानिमित्त तालुक्याचे ठिकाण असलेले पेण, तसेच मुंबई, ठाणे येथे रहायला गेले आहेत. त्यामुळे प्रामुख्याने वृद्ध पुरुष आणि महिला गावात राहतात. ७० कुटुंबांची वस्ती असलेल्या या गावात मूठ ४०० ग्रामस्थांची वस्ती आहे. गावाच्या एका बाजूला उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असून, आपत्तीच्या तोंडावरच हे गाव वसलेले आहे. त्यामुळे येथे तळीयेची पुनरावृत्ती होऊ नये, असे ग्रामस्थांकडून बोलले जाते.

                                                                                                              – मितेश जाधव


हेही वाचा – पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी २० ऑगस्टपासून विमानसेवा होणार सुरु


 

First Published on: August 15, 2021 7:04 PM
Exit mobile version