बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले

खारघरमधील कोपरा खाडीत रेल्वे पुलाजवळ अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर पनवेल महसूल विभागाने कारवाई केली आहे. खारघरमधील कोपरा खाडीत अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतच्या तक्रारीनुसार पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पनवेल महसूल विभागाने अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. मागील महिन्यात देखील पनवेलमधील रोडपाली व वाघिवली येथे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांवर तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
अनधिकृत रेती उत्खनन होत असून, त्यामुळे रेल्वे पुलाला धोका निर्माण होत असल्याची माहिती तहसीलदार विजय तळेकर यांना मिळाली. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी संतोष कचरे, एल. आर. राऊळ, मनीष जोशी, तलाठी सज्जा अंकिता लोखंडे, संजय बिक्कड यांनी खारघर येथील कोपरा खाडी रेल्वे पुलाजवळ खारघर पोलिसांच्या साथीने धाड टाकली.
खारघर येथील कोपरा खाडीमध्ये रेल्वे पुलाजवळ पथकाने केलेल्या पाहणीत अनधिकृतपणे सक्शन पंपाच्या साहाय्याने रेती उत्खनन करून तीन कोंड्यात भरून ठेवलेली ७ ते ९ ब्रास रेती आढळून आली. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने कोंड्या उद्ध्वस्त केल्या तसेच कटरच्या साहाय्याने सक्शन पंपचे तुकडे केले. तसेच खाडी मार्गावर जाणारे अंतर्गत रस्ते जेसीबीच्या साहाय्याने चरी खोदून बंद करण्यात आले. कारवाईनंतर अज्ञात व्यक्तीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा – Maratha Reservation: राज्याला आरक्षणाच्या अधिकारापेक्षा, आरक्षण मर्यादेत वाढ गरजेची- अशोक चव्हाण


First Published on: August 4, 2021 8:36 PM
Exit mobile version