काश्मीरमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप घडवण्याचा डाव

काश्मीरमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप घडवण्याचा डाव

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोर्‍यात आक्रमक झालेल्या गुपकार गटाच्या प्रक्षोभक विधानांची दखल अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी घेतली आहे. तसेच या नेत्यांनी देशभावनेविरोधात कारवाया सुरू ठेवल्या तर त्यांचा अंत निश्चित आहे. शाह यांनी ट्विटरवर गुपकार गटाचा उल्लेख गुपकार गँग असा केला. तसेच ही मंडळी काश्मीरमध्ये परकीय शक्तींचा हस्तक्षेप घडवून आणू इच्छित आहेत, असा आरोप अमित शहा यांनी केला.

अमित शहा यांनी गुपकार गटाला पाठिंबा देणार्‍या काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले की, गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. आता सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा गुपकार गँगच्या अशा कारवायांना पाठिंबा आहे काय? त्यांनी देशातील जनतेसमोर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. तसेच या ग्लोबल आघाडीचा हेतू हा कुठल्याही प्रकारे कलम ३७० लागू करणे हाच आहे.

अमित शाह आपल्या पुढच्या ट्विटमध्ये म्हणाले की, काँग्रेस आणि गुपकार गँग जम्मू आणि काश्मिरला पुन्हा एकदा दहशतीच्या युगात घेऊन जाऊ इच्छित आहेत. ते दलित, महिला आणि आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच देशातील जनता प्रत्येक ठिकाणाहून काँग्रेसला रिजेक्ट करत आहे. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला आहे. भारताची जनता राष्ट्रहिताविरोधात तयार झालेल्या कुठल्याही अपवित्र ग्लोबल आघाडीला सहन करणार नाही. गुपकार गटाने देशासोबत चालावे अन्यथा देशातील जनता त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणतील.

First Published on: November 18, 2020 7:21 AM
Exit mobile version