बर्ड फ्लूचा ठाण्यात ही शिरकाव; अहवालानंतर त्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच

बर्ड फ्लूचा ठाण्यात ही शिरकाव; अहवालानंतर त्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच

बर्ड फ्लूचा ठाण्यात ही शिरकाव

घोडबंदर रोड परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी मृतावस्थेत सापडलेल्या पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाला नसल्याचे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार याने स्पष्ट केले होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण, आता त्या पक्षांचा शवविच्छेदनाच्या अहवालानंतर बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालात तीन पाणबगळे आणि एका पोपटाला बर्ड फ्लूने झाल्याचे नमूद असल्याने ठाण्यात बर्ड फ्लू या आजाराने शिरकाव केलेला दिसत आहे. याबाबत ठाणे महापालिका प्रशासन विभागाने ही दुजोरा दिला आहे.

घोडबंदर पट्ट्यातील कावेसर या भागात विजय गार्डन आणि कोकणी पाडा येथील हिल गार्डन या परिसरात मागील आठवड्यात बुधवारी १६ पक्षी हे मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यातील आठ पक्षी हे कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे उर्वरीत आठ पक्ष्यांचे अवशेष सुरक्षेचा उपाय म्हणून तपासणीसाठी पाठवले होते. याचदरम्यान मृतावस्थेत सापडलेल्या पोपटांपैकी एक पोपट आणि तीन पाण बगळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. उर्वरीत चार पक्ष्यांचा अहवाल येणे बाकी आहे.

दरम्यान बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यात हाय अलर्ट करण्यात आला आहे. राज्यात या रोगाचा धोका नसल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते. परंतु, आता ठाण्यात बर्ड फ्ल्यूने शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ठाणेकरांना महापालिकेने सावध राहण्याचा इशारा दिला असून अशा प्रकारे पक्षी मृतावस्थेत आढळल्यास पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

‘मृतावस्थेत सापडलेल्या पक्षांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाल्याचा दुजोरा देत, या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरू केली आहे. तसेच पक्षी मृतावस्थेत आढळल्यास नागरिकांनी महापालिकेशी संपर्क करावा’. – संदीप माळवी, उपायुक्त, ठामपा


हेही वाचा – Bird Flu: नांदेडमध्ये खळबळ; कोंबड्या, कावळ्यांनंतर शेकडो मधमाशांचा मृत्यू


First Published on: January 11, 2021 6:32 PM
Exit mobile version