राऊत-फडणवीस चर्चेचा इफेक्ट; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षावर

राऊत-फडणवीस चर्चेचा इफेक्ट; मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शरद पवार वर्षावर

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा लागोपाठ महाभेटी घडताना दिसत आहेत. हा निव्वळ योगायोग आहे की पडद्यामागे काहीतरी शिजत आहे, हा प्रश्न तूर्त अनुत्तरीतच आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या भेटीवरून बराच किस पाडला जात असताना रविवारी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी थेट वर्षा निवासस्थानी पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. राऊत-फडणवीस भेटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

शरद पवार हे विविध मुद्यांवर विचारविनिमय करण्यासाठी सातत्याने मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत असतात. महाविकास आघाडीचे मार्गदर्शक या नात्याने पवार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात. कोरोनाची साथ, निसर्ग चक्रीवादळाचे संकट, मराठा आरक्षणाबाबत निर्माण झालेला पेच या मुद्यांवर पवार यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मात्र, शरद पवारांची आजची वर्षाभेट या सगळ्या भेटींपेक्षा लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेतील एक प्रमुख नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कालच भेट घेतली असताना पवार तातडीने मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्याने या भेटीचे महत्त्व वाढले आहे.

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल २६ सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये तब्बल दोन तास बैठक चालली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, सुरुवातीला या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याचे दोन्ही पक्षांनी नाकारले. त्यानंतर संजय राऊत यांनी भेट झाल्याचे सांगितले. संजय राऊत यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई भाजपला नाही, केवळ ‘सामना’च्या मुलाखतीसाठी भेट झाली असे सांगितले. मात्र, दोन्ही नेत्यांच्या भेटीनंतर शरद पवार अलर्ट झाले असून त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची वर्षावर भेट घेतली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देताना, शिवसेनेत गुप्त बैठक करण्याची पद्धत नाही. मला ‘सामना’साठी देवेंद्र फडणवीस यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यविषयक संस्थांचीही इच्छा आहे, की मी संपादक म्हणून फडणवीसांची जाहीर मुलाखत करावी. त्यासंदर्भात चर्चा केली, असे सांगितले. राजकारणात वैयक्तिक शत्रुत्व नसतं आणि आम्ही काही वैयक्तिक शत्रू नाही. भाजपसोबत असतानाही मी शरद पवारांशी बोलायचो. उद्धव ठाकरे आजही नरेंद्र मोदींना आपले नेते म्हणतात. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

First Published on: September 28, 2020 6:51 AM
Exit mobile version