Mumbai-goa Highway : महामार्गाच्या कामाच्या देखरेखीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Mumbai-goa Highway : महामार्गाच्या कामाच्या देखरेखीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Mumbai-goa Highway : महामार्ग कामाच्या देखरेखीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मंदगतीने चालले असल्याने नेते मंडळींच्या २०२१ मध्ये महामार्ग पूर्ण होण्याच्या वल्गना हवेत विरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशात सर्वाधिक रखडलेल्या या महामार्गाच्या प्रकल्पाची रखडलेला प्रकल्प म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने अद्याप नोंद कशी घेतली नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याचवेळी नेते आले की ‘उगवणारे’ महामार्ग बांधकाम खात्याचे अधिकारी या कामाकडे नक्की लक्ष ठेवून आहेत का, असा सवालही यातून उपस्थित झाला आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणात श्री काळभैरव देवस्थान कमानी जवळून भुमिगत मार्गिकेचे काम ऐन पावसाळा तोंडावर आला असताना ठेकेदार कंपनीने हाती घेतले. अंदाजे ३० फुटापर्यंत खोदकाम करून होत नाही तोच पाऊस सुरू झाल्यामुळे ते अर्धवट ठेवले. परिणामी ऐन पावसाळ्यात उर्वरित अरूंद रस्त्यावरून होणार्‍या दुहेरी वाहतुकीमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सातत्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आताही हे काम मंदगतीने सुरू असून, दुर्तफा सर्विस रस्ता झालेला नाही.

तसेच महामार्गात समाविष्ट असलेल्या ६ किलोमीटरच्या कशेडी घाटात अद्याप काही ठिकाणी रस्त्याचे तुकडे सिमेंट काँकीट करण्याचे राहिले असून, दोन्ही बाजूचा एक संघ सिमेंट काँक्रीट रस्त्याचे जोडण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. ठिकठिकाणी दरीच्या बाजूला रस्त्याच्या रूंदी करणासाठी करण्यात आलेला मातीचा भराव पावसाळ्यात कोसळल्याने त्याचे काम सुरू असून, डोंगराच्या बाजूला सिमेंट काँक्रीटच्या भिंती आणि दगडी भिंतीचे काम सुरू आहे. तसेच जागोजागी असलेल्या मोर्‍यांचे बांधकाम, डोंगर बाजूला पाणी निचरा होण्यासाठी गटारे, दरीच्या बाजूला सरंक्षक कठडे, रस्त्याचे दुभाजक आदी कामे अद्याप झालेली नाहीत.

त्यामुळे नेते मंडळी घाटात पहाणीकरता आले की त्यांच्या मागे-पुढे असणारे महामार्ग बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, विभागीय अधिकारी पदाचा दर्जा असलेले नोकरशहा केवळ नेत्यांना मुजरा करण्यासाठी धुमकेतूसारखी उगवतात काय, असा प्रश्न स्थानिक जनतेकडून उपस्थित केला जात असून, महामार्ग बांधकाम विभाग रायगड आणि संबंधित ठेकेदार कंपनी या यंत्रणावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. त्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने महामार्गाचे काम जलदगतीने होण्यासाठी, तसेच जागोजागी सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या चिरा त्यामुळे पुढील काळात होणारी रस्त्याची दुरवस्था याची आताच दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

                                                                                                  वार्ताहर – बबन शेलार


हे ही वाचा – Vaccination : लसीचे दोन डोस घेतलेल्या अत्यावश्यक सेवा, सरकारी कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा


 

First Published on: October 26, 2021 11:21 PM
Exit mobile version