बापरे! ‘त्या’ एकामुळे केडीएमसीच्या महापौरांसहीत ५०० लोक होम क्वारंटाईन 

बापरे! ‘त्या’ एकामुळे केडीएमसीच्या महापौरांसहीत ५०० लोक होम क्वारंटाईन 

केडीएमसीच्या महापौरी विनिता राणे

तुर्केस्थानहून डोंबिवलीत परतलेल्या एका २६ वर्षीय तरूणाला होम क्वारंटाईनचा सल्ला दिला असतानाही त्याने आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि  लग्नसोहळयात हजेरी लावली होती.  तो तरूण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने त्याच्यावर मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र लग्न सोहळयात पाचशेच्या आसपास लोकांनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये केडीएमसीच्या महापौर विनिता राणे यांच्यासह अनेक राजकीय नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे महापौरही होम क्वारंटाईन झाल्या असून, ज्या लोकांनी लग्न सोहळयात हजेरी लावली होती त्यांनीही १४ दिवस होम क्वारंटाईन राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

डोंबिवली पूर्वेतील आयरे परिसरात राहणारा हा तरूण १५ मार्चला तुर्कस्थानवरून आला होता. मुंबईत आल्यावर त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. पण क्वारंटाईनमध्ये न राहता त्याने १८ मार्च आणि १९ मार्च रोजी चुलत भावाच्या  हळदी आणि लग्न सोहळयाला हजेरी लावली होती. मात्र २६ मार्चला  त्याला सर्दी व खोकल्याचा त्रास झाल्याने त्याला मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची तपासणी केल्यानंतर तो करोना पॉझिटिव्ह आढळला  आहे.  त्याच्या कुटूंबियांचीही तपासणी करण्यात आली असून, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

याप्रकरणी त्या तरूणावर आणि लग्न सोहळयातील आयोजकांवर डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र या लग्न सोहळयात महापौर विनिता राणे यांच्यासह अनेक राजकीय पदाधिका-यांनी हजेरी लावली होती. त्या सर्वाना पोलिसांनी होम क्वारंटाईन राहण्याचे आवाहन केले आहे.  महापौर हाेमक्वारंटाईन असल्याच्या वृत्ताला त्यांचे  पती नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी दुजोरा दिला.

First Published on: March 28, 2020 10:03 PM
Exit mobile version