नव्या वर्षातच सर्वाना लोकल प्रवासाची मुभा

नव्या वर्षातच सर्वाना लोकल प्रवासाची मुभा

कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेली मुंबईची लाईफ लाईन, लोकल येत्या १५ डिसेंबरला सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, लोकल सुरू करण्याबाबत ३१ डिसेंबरनंतरच निर्णय घेऊ, असे सांगत मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. लोकल बंद असल्यामुळे मुंबईकरांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. बेस्ट आणि एसटीच्या बसेस् प्रवासासाठी पुरेशा नाहीत. त्यामुळे लोकल सुरू करण्याची मागणी मुंबईकरांकडून होत असताना महापालिकेने मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत असतानाच कोरोनावरही बर्‍यापैकी नियंत्रण मिळविले जात आहे. परिणामी मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल १५ डिसेंबरनंतरच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याची चिन्हे होती. मात्र याबाबतचा निर्णय कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच घेतला जाणार आहे. कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चाचण्यांची संख्या वाढवण्यासोबतच रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तिंची चाचणी व पडताळणी सातत्याने करण्यात येत आहे. महापालिकेने केलेल्या उपाय योजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे.

तत्पूर्वी गणेशोत्सवात नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता. परिणामी दसरा आणि दिवाळीदरम्यान नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेने केले होते. दसर्‍याला नागरिकांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला देखील; मात्र दिवाळीदरम्यान नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. परिणामी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त केली गेली. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने दिवाळीनंतर परराज्यातून मुंबईत दाखल होणार्‍या प्रवाशांच्या कोरोना चाचण्या सुरू केल्या. कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी इतर उपाय योजनाही हाती घेतल्या. याचा सकारात्मक परिणाम म्हणून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे.

First Published on: December 11, 2020 6:13 AM
Exit mobile version