वाचा आणि थंड बसा, काही आठवतंय का?

वाचा आणि थंड बसा, काही आठवतंय का?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन. लेखाचे शीर्षक वाचून काही आठवतंय का? हो बरोबर हेच ते वाक्य, ज्या वाक्यातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची स्थापना झाली आणि यापुढील वाक्य होते वाचा आणि जागे व्हा, पेटून उठा, संघटित व्हा. आज पुन्हा या वाक्याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे आणि ती यासाठी की शिवसेनेची झालेली आजची अवस्था. मी कोणीही कट्टर शिवसैनिक वगैरे नाही तसेच कधी बाळासाहेबांशी वैयक्तिक संबंध नाही की काही वैयक्तिक फायदाही नाही, तरी बाळासाहेबांचे नाव ऐकल्यावर किंवा घेतल्यावर आपसूकच अंगावर शहारे येतात. का कोणास ठाऊक बाळासाहेब म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मराठी माणूस हे एक समीकरण झाले आहे.

माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाप्रमाणे अशी किती मराठी माणसांची हीच भावना असेल. त्या शिवसेनेची सध्याची परिस्थिती पाहून वाईट वाटते. कधीतरी असे वाटते ही अवस्था शिवसेनेची नसून मराठी माणसांची आहे आणि त्याहून वाईट वाटते की हे करण्यामागे असलेले आणि दिल्लीत बसलेले परप्रांतीय हात आणि त्यांना मिळालेली आपल्याच मराठी माणसांची साथ, त्यामागचे एकमेव कारण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन वीरमरण पत्करून त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आपली मुंबई. येथे इतिहासातील महाराजांचे एक वाक्य आठवते, स्वराज्याला जास्त धोका परकीयांपासून नसून आपल्याविरुद्ध उभ्या असलेल्या स्वकीय लोकांकडून जास्त आहे. याच सत्ताधार्‍यांचे 25 वर्षांपूर्वी जेव्हा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रमध्ये अस्तित्व नव्हते तेव्हा बाळासाहेबांनीच हात देऊन यांना सोबत घेतलं.

महाराष्ट्रातील मराठी माणसाने युतीला 25 वर्षे मतदान केले ते ह्यांच्या नेत्यांचे फोटो बघून नाही तर फक्त आणि फक्त बाळासाहेबांसाठी आणि त्याच शिवसेनेला आज हे संपवायला निघाले आहेत. यांना आणि ह्यांच्या दिल्लीत बसलेल्या नेत्यांना माहीत आहे की मुंबईमध्ये आपल्याला कट्टर मराठी माणूस कधीच मतदान करणार नाही म्हणून फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची कूटनीती वापरून शिवसेना फोडली आणि शिवसेना फोडून त्यांनी मराठी माणसांमध्ये फूट पाडली. एवढी फूट पाडूनसुद्धा यांना जिंकण्याचा आत्मविश्वास नाही आणि म्हणून अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध निवडून दिली. तिथेही उमेदवार परप्रांतीयच होता (मुरजी पटेल) याचा विचार करा. मराठी मतांची विभागणी शिंदे गट, राणे समर्थक, राज समर्थक, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांच्यासमोर गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, दाक्षिणात्य एकगठ्ठा मतदान याचा परिणाम हाच की उद्या मुंबईमध्ये या परप्रांतीयांची मक्तेदारी वाढणार आहे.

एक साधं गणित आहे जर आपला मराठी नगरसेवक, आमदार निवडून आला तर त्याच्या हाताखाली सर्व पदाधिकारी शक्यतो मराठीच असतात. त्याउलट जर इथे कोणता उत्तर भारतीय गुजराती नगरसेवक झाला तर त्याच्या हाताखालील पदाधिकारी स्वतःची माणसेच भरणार आणि आपली मराठी मुले फक्त बॅनर, झेंडे लावायला आणि अंगावर केसेस घ्यायला. उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर जोगेश्वरीसारख्या मराठीबहुल भागात नगरसेवक यादव तर पक्षाच्या पदावर त्यांचीच पत्नी, दुसरे उदाहरण गोरेगाव पश्चिम येथील बहुतेक सर्व नगरसेवक देसाई, ठाकूर, पटेल, पिल्लई. संपूर्ण विभागात एकही मराठी माणूस उमेदवार नगरसेवक या पदाला लायक नाही मिळाला का? उद्या हीच परिस्थिती राहिली तर मुंबईमध्ये परप्रांतीयांची सत्ता येण्यास वेळ लागणार नाही आणि मुंबईचा महापौर शर्मा, यादव, मिश्रा, सिंह, ठाकूर, सिंग, लोढा असेल आणि याचे उदाहरण राजेश शर्मा यांना उपमहापौर म्हणून करून आधीच दाखवून दिले आहे. सध्या मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आहेत.

आता या प्रश्नाचे उत्तर शिवसेनेने एवढी वर्षे मराठी माणसांसाठी काय केले? बाळासाहेबांमुळेच आपली आधीची पिढी मुंबईमध्ये स्थिरावली आणि त्यांना मुंबईमध्ये स्थान मिळाले. स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अनेक जणांना एलआयसी, बँका, एअर इंडिया अशा अनेक सरकारी-निमसरकारी ठिकाणी नोकर्‍या मिळाल्या. त्यामुळे ती पिढी मुंबईमध्ये टिकू शकली आणि आता त्यांचीच मुले म्हणजे आपली पिढी मुंबईमध्ये आहे आणि आता ते टिकवणे आपल्या हातात आहे. एका बाजूला गुजराती, मारवाडी आपल्या मुलांना शिकवून पुढे नेत आहेत आणि आपण आपल्या प्रगतीचा विचार न करता फक्त व्यसनामध्ये वाहत चाललो आहोत. आज तुम्ही मुलांना चांगले संस्कार, शिक्षण दिले तर ती उद्या मुंबईमध्ये चढाओढीच्या स्पर्धेत टिकू शकतील, मग तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षाला प्रश्न विचारण्याची गरज नाही की मराठी माणसासाठी काय केले? आज काही राजकीय पक्ष आपल्या मुलांना छोटी छोटी पदे देऊन खूश करत आहेत आणि आपल्याच मतांचे विभाजन करत आहेत. शिवसेना सोडून गेले ते बोलत आहेत आम्ही 40-50 वर्षे शिवसेनेत मेहनत केली, पक्ष वाढवला, आमचे आयुष्य शिवसेनेसाठी वेचले, अरे पण बाळासाहेबांनी तुम्हाला ओळख दिली म्हणून तुम्ही वाढलात.

मतदार तुम्हाला मतदान करत नव्हते, तो शिवसेनेला, बाळासाहेबांना मतदान करत होता. उद्या शिवसेना नाव नसेल तर तुम्ही निवडून येणार नाही हे तुम्हाला आणि तुमच्या पाठीमागे असलेल्या महाशक्तीला माहीत आहे म्हणून सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून नाव व चिन्ह मिळवून घेतले, पण कट्टर मराठी मतदार कसे मिळवणार. सामान्य मतदार हे सर्व पाहत आहे आणि पुढील निवडणुकीत हे सर्व दाखवूनही देतील. ज्या पक्षाला तुम्ही मदत करत आहात त्या पक्षाचा इतिहास पाहिलात का? ज्या ज्या पक्षांची त्यांनी मदत घेतली त्यांना तर संपवण्याचा प्रयत्न केलाच, पण स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते ज्यांनी उभे आयुष्य पक्षासाठी वेचले त्यांच्याशीही प्रामाणिक राहिले नाही. एकनाथ खडसे, पंकजाताई मुंडे, लालकृष्ण अडवाणी, सध्याचे उदाहरण घेतले तर स्वर्गीय मुक्ता टिळक, मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी नाकारून त्यांनी याची जाणीव करून दिली. तर असा पक्ष उद्या या फुटलेल्या 40 आमदारांशी, मुंबईशी आणि मराठी माणसांशी काय प्रामाणिक राहणार.

कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे मुंबईला संयमी वृत्तीने निर्णय घेऊन सुरक्षितरीत्या बाहेर काढले, तीच टाळ्या वाजवून आणि मेणबत्ती पेटवून बाहेर निघाली नसती आणि याची दखल मुंबई, महाराष्ट्र देशानेच नाही तर पूर्ण जगाने घेतली. तेच जर मुंबई सध्याच्या केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या हातात असती तर मला नाही वाटत या आपुलकीने कोरोनाची परिस्थिती हाताळली असती. म्हणून सांगतो मुंबईमध्ये फक्त आणि फक्त आपली शिवसेना असावी तरच मराठी माणसाचे अस्तित्व टिकेल. आज एका देशाचे पंतप्रधान एवढ्या उच्चपदावर बसूनही आपल्या राज्याचा विचार करतात, तर आपण तर एक सामान्य नागरिक आहोत. आपण आपल्या मुंबईचा विचार का करू नये. आज आपल्याला माहीत आहे की बर्‍याच गोष्टी गुजरातमध्ये चालल्या आहेत. त्याचेच एक उदाहरण जशी मुंबईमध्ये बीकेसी तसेच गांधीनगरमध्ये गिफ्ट सिटी उभारण्यात आली. आज सर्व मल्टिनॅशनल बँक ऑफिसेस गिफ्ट सिटीमध्ये चालू झाली आहेत.

बहुतेक नवीन जॉब ओपनिंग तेथे येत आहेत. जर अशी परिस्थिती राहिली तर आपल्या पुढच्या पिढीला नोकरीसाठी स्थलांतर करावे लागेल. शिवसेनेत असताना प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. ते त्या पक्षात गेल्यावर किरीट सोमय्या गप्प का? समृद्धी महामार्ग चार वर्षात होतो. मुंबई-गोवा महामार्ग का नाही? आज महागाई एवढी वाढली आहे पेट्रोल +100, गॅस +1000, होम लोन +9 टक्क्यांच्या वरती आणि बरेच आहे आणि आम्हाला जातीविषयक राजकारणात अडकवले जात आहे. स्थानकांची नावे बदलून आणि भव्य मंदिरे उभारून गरिबांची पोटे भरणार आहेत का? मला येथे सत्ताधार्‍यांना आणि शिवसेनेतून फुटून गेलेल्या 40 आमदारांना एवढेच आवाहन करायचे आहे की, जर तुम्हाला आपल्या माननीय पंतप्रधानांच्या लोकप्रियतेवर, कामावर आणि हिंदुत्वावर एवढाच विश्वास असेल तर उद्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही आपल्या माननीय पंतप्रधानांचा फोटो लावून मते मागा आणि शिवसेना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मते मागून बघूया. तेव्हा कळेल की मुंबईमध्ये तुम्हाला किती आणि शिवसेनेला किती जागा मिळतात.

– सुनील सावंत

First Published on: June 8, 2023 11:23 PM
Exit mobile version