‘जन्टलमन्स गेम’ की शेम शेम!

‘जन्टलमन्स गेम’ की शेम शेम!

साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या जिथे-जिथे वसाहती उभ्या राहिल्या, तिथे-तिथे इंग्रजांच्या खाणाखुणा आजही अस्तित्वात आहेत. त्यातील अनेक पुसल्या जाणे अशक्यच आहे. क्रिकेट हा खेळसुद्धा त्यांचीच ‘देन’ आहे. ब्रिटिशांमुळे हा खेळ ‘जन्टलमन्स गेम’ म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला तो उच्चभ्रू वर्गातच खेळला जात होता. सभ्यतेच्या मर्यादा आणि संबंधित नियमांचे पालन करून हा खेळ खेळला जात होता. हळूहळू त्याचा जगभरात प्रसार होत गेला. तेव्हाही पातळी घसरली नव्हती. कालांतराने या खेळातही वादंगाने प्रवेश केला, तोही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यासारखे आक्रमक देश या खेळात उतरल्यानंतरच. 1981 मध्ये पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा क्रिकेट सामना याचसाठी गाजला होता. त्यावर्षी पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला होता.

जावेद मियांदाद पाकिस्तानी क्रिकेट संघाचे नेतृत्व करत होता आणि कर्णधार म्हणून त्याचा हा पहिलाच दौरा होता. पाकिस्तानच्या संघात त्याच्या नियुक्तीवरून खदखद सुरू होती. अशातच मालिकेतील पहिला सामना नोव्हेंबरमध्ये पर्थ येथे खेळला गेला. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डेनिस लिली आणि मियांदाद यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यावेळी मियांदादने लिलीवर हातातील बॅटही उगारली होती. या ‘सभ्य खेळा’ला लागलेले ते पहिले गालबोट म्हणावे लागेल. भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे सामने तर एक छोटेखानी युद्धच असते. त्यामुळे त्यात असे प्रकार वरचेवर घडतात. सदानंद विश्वनाथ आणि मियांदाद, हरभजन सिंग आणि शोएब अख्तर यांच्यातील वादविवाद असेच गाजले होते. तसे ते अपेक्षित होते. तर दुसरीकडे, ज्यांची दहशत वाटत होती, अशा वेस्ट इंडिजच्या संघाकडून वारंवार ‘जंटलमन्स गेम’चा प्रत्यय अनुभवायला येत होता.

1987 मध्ये विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या कर्टनी वॉल्शला नॉन-स्ट्रायकरवर असलेल्या सलीम जाफरला बाद (मंकडिंग) करून सामना जिंकण्याची संधी होती, पण त्याने तसे केले नाही. परिणामी, वेस्ट इंडिजने तो सामना गमावला. हा ‘जंटलमन्स गेम.’भारतीय क्रिकेट संघाच्या बाबतीत म्हणायचे झाले तर 1983 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेट खेळाला एक वेगळेच वलय प्राप्त झाले. भारतीयांसाठी हे यश अनपेक्षित असले तरी भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंनी प्रत्यक्षात मैदानात उतरून केलेल्या मेहनतीचे ते फळ होते. प्रसिद्धीचे हे वलय दिसताच, अनेक जण या खेळाकडे वळले. प्रसिद्धीबरोबरच धनही आले. हे क्रिकेटपटू विविध जाहिरातीत झळकू लागले. त्यामुळे हे क्रिकेटपटू मालामाल झालेच, पण त्याचबरोबर भारतात या खेळावर नियंत्रण ठेवणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देखील जगातील श्रीमंत क्रिकेट क्लब ठरला आहे. हा केवळ खेळ न राहता, प्रोफेशन बनले. आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग सुरू झाल्यानंतर सर्वच क्रिकेटपटू मालामाल झाले.

आयपीएलमध्ये क्रिकेटपटूंवर लाख ते कोटींमध्ये बोली लागते. त्यांना चांगला भाव मिळतो, पण चांगला भाव मिळाल्यावर ते ‘भाव’ही खाऊ लागतात आणि हीच मग्रुरी त्यांच्या देहबोलीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दिसू लागते. परिणामी, सामन्यांदरम्यान वाद होत राहणे, यात नवीन असे काहीच राहिले नाही. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासूनच याला सुरुवात झाली. मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने पंजाबच्या एस. श्रीसंत याच्या कानशिलात लगावली होती. यानंतर हरभजनने श्रीसंतची ड्रेसिंग रुममध्ये जाऊन माफी मागितली होती. त्यावेळी हरभजनवर 11 सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. असाच काहीसा प्रकार 2014 साली मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू किरॉन पोलार्ड आणि आरसीबीचा प्रमुख गोलंदाज मिशेल स्टार्क यांच्यात झाला. तेव्हा चिडलेल्या पोलार्डने सामन्यादरम्यान स्टार्कच्या दिशेने बॅट फेकली होती.

आयपीएल 2013 मध्ये आयपीएल स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली अंकित चव्हाण, अजित चंदीला आणि एस. श्रीसंत यांना अटक करण्यात आली होती. यानंतर बीसीसीआयने राजस्थान आणि चेन्नई या दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घातली होती. याच आयपीएल स्पर्धेत केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर यांच्यात वादावादी झाली. पंचाने मध्यस्थी करून दोघांना बाजूला केले. योगायोगाने 10 वर्षांनी आयपीएल स्पर्धेच्या 16व्या हंगामात सोमवारी लखनऊ विरुद्ध आरसीबी सामन्यादरम्यान पुन्हा एकदा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला. गोलंदाज मोहम्मद सिराज याच्यामुळे हा वाद सुरू झाल्याचे सांगितले जाते.

पंचांनी त्याचा एक चेंडू नोबॉल ठरविल्याने त्याला राग आला आणि त्याने त्याच रागात नवीन उल हक हा क्रीझमध्ये असतानाही स्टम्पवर बॉल फेकून मारला. तेथूनच वादाला सुरुवात झाली. प्रथम नवीन आणि सिराजमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर विराट कोहलीने त्या वादात उडी घेतली. प्रत्यक्षात हेच कारण असेल तर आपला एखादा चेंडू नो-बॉल ठरवला तर यात चिडण्यासारखे काय आहे? हा खेळाचाच एक भाग आहे. खेळातील नियमांनुसार जर चालले असेल तर ते स्वीकारायलाच हवे. तरच तो ‘जंटलमन्स गेम’ होईल, अन्यथा हा ‘मनमानीचा खेळ’ ठरेल. या सर्वांत सचिन तेंडुलकरने कोणत्याही वादात न पडता पूर्णपणे समर्पणाने आपला खेळ केला आणि क्रिकेटचा देव ठरला. भारतीय खेळाडूंनी तरी त्याचा आदर्श घेण्याची गरज आहे.

First Published on: May 4, 2023 4:16 AM
Exit mobile version