एक बदनाम मुसाफिर!

एक बदनाम मुसाफिर!

विविध कारणांमुळे वादाचे धनी ठरलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दिला आणि त्यांनी तो मंजूर केला. त्यामुळे कोश्यारी राज्यातून पदमुक्त झाले. त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. ज्या चुका राज्यपाल कोश्यारी यांनी करून तेे राज्यातील राजकीय पक्षांच्या आणि जनतेच्या रोषाला कारणीभूत ठरले आणि ज्या नामुष्कीने त्यांना हे पद सोडावे लागत आहे, त्याची पुनरावृत्ती रमेश बैस करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. कारण ज्या राज्याचे आपण राज्यपाल असतो, त्या राज्यातील लोकांच्या भावना कुठल्या गोष्टींशी जोडलेल्या आहेत, याचा त्यांनी विचार करून त्यानुसार आपली वक्तव्ये करण्याची गरज असते, पण त्याचे जर राज्यपालांना भान राहिले नाही, तर त्याची परिणती कशात होते, त्याची कोश्यारींची कारकीर्द हे मासलेवाईक उदाहरण आहे. कोश्यारी यांनी वेळोवेळी घेतलेली भूमिका आणि त्यांनी केलेली वक्तव्ये यामागे केवळ त्यांची स्वत:ची बुद्धी होती, असे म्हणता येणार नाही. त्यामागे भाजपच्या केंद्रीय नेत्यांची व्यूहरचना होती, हेही विसरून चालणार नाही.

महाराष्ट्रात २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर आपलीच सत्ता पुन्हा येणार याची ठाम खात्री भाजपला वाटत होती, पण पुढे भाजपने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मिळवायचे आणि वचनभंग करणार्‍या भाजपला धडा शिकवायचा असा चंग त्यांनी बांधला. त्यातूनच महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण यामुळे भाजपचा मोठा अपेक्षाभंग झाला आणि काहीही करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ता घालवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू झाले, पण महाविकास आघाडीचे मुख्य सूत्रधार हे राज्यातील मातब्बर नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याने महाविकास आघाडीचे सरकार खाली खेचणे वाटते तितके सोपे नव्हते. त्यामुळेच भाजपला आपल्या रणनीतीला पोषक ठरणारी माणसे मैदानात उतरवायची होती. भगतसिंह कोश्यारी हे अशांपैकीच एक होते.

राज्यपाल ही व्यक्ती तशी राजकारणात सक्रिय नसली तरी ती घटनात्मकदृष्ट्या फार महत्वाची असते. कारण ती व्यक्ती राष्ट्रपतींचे राज्यात प्रतिनिधित्व करत असते. राज्यात जर का राजकीय आपत्कालीन स्थिती निर्माण झाली, तर राज्यपाल राज्याला निराधार होऊ देत नाहीत. ते त्यातून मार्ग काढत असतात. त्यामुळे राज्यपालांची भूमिका ही समन्वयकाची असते, पण राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका आणि त्यांच्या एकूणच महाराष्ट्रातील कारकिर्दीचा विचार केला तर त्यांना दिल्लीतून काही तरी वेगळीच जबाबदारी देऊन महाराष्ट्रात पाठवले होते की काय, असे वाटावे, अशी त्यांची वर्तणूक राहिली. त्यात पुन्हा भर म्हणजे महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तिमत्वांबद्दल त्यांनी सारासार विचार न करता लोकभावना दुखावल्या जातील, अशी वक्तव्ये केली. त्यामुळे त्यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी राज्यभर आंदोलने केली आणि राज्यपाल हटावोची मागणी लावून धरली, पण अशा वेळी भाजपने राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर मौन तरी बाळगले किंवा राज्यपालांच्या वक्तव्यांचा गैरअर्थ लावण्यात येत आहे, ते महाराष्ट्रप्रेमी आहेत, असे सांगून त्यांचे समर्थन करण्याचा लटका प्रयत्न केला.

भाजपची हातातोंडाशी आलेली सत्ता उद्धव ठाकरे यांच्या वेगळ्या भूमिकेमुळे गेलेली होती, त्यामुळेच त्यांना राज्यपालपदी राजकीय नुस्के माहीत असलेल्या व्यक्तीची गरज होती. त्यातूनच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि राजकीय अनुभव गाठीशी असलेले भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आणण्यात आले. बहुतांश राज्यपाल हे सुटाबुटातील असतात, पण भगतसिंह कोश्यारी यांची वेशभूषा ही यापेक्षा वेगळी होती. धोतर आणि काळी टोपी अशी त्यांची वेशभूषा पाहून राज्यातील लोकांना आश्चर्यच वाटले. धोतर हे जरी भारतीय परंपरेतील नेसूचे वस्त्र असले तरी त्यांच्या काळ्या टोपीच्या माध्यमातून त्यांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी एकनिष्ठ आहोत, हे दाखवून दिले होते. कारण संघाच्या गणवेशातील टोपी ही काळ्या रंगाची असते.

राज्यपाल हे प्रामुख्याने सल्लागाराचे काम करत असतात. ते राज्याच्या राजकारणात सक्रिय होत नाहीत, पण राज्यपाल कोश्यारी यांनी सुरुवातीपासूनच आपण कशासाठी आलो आहोत, याची चुणूक दाखवायला सुरुवात केली. त्यांनी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांंना हिंदुत्व सोडल्यावरून चक्क पत्र पाठवून एक प्रकारे टार्गेट केले, खरे तर हे काम राज्यपालांचे नाही. त्यानंतर राज्यपालांनी विधान परिषदेवर विविध क्षेत्रातील नियुक्त करावयाच्या १२ आमदारांची नावे महाविकास आघाडीने पाठवली होती, पण ती नावे भाजपला पोषक ठरणारी नसल्यामुळे राज्यपालांनी त्यांना शेवटपर्यंत लटकवून ठेवले. त्या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्यापर्यंत मामला गेला, पण तो राज्यपालांच्या अधिकारक्षेत्राचा भाग असल्याचे दिसून आले.

गुजराती-मारवाडी लोकांची भलामण करून राज्यपालांनी मुंबईतील मराठी लोकांना दुखावले. पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांची सत्ता गेली आणि भाजप-शिंदे गटाची सत्ता आली. त्यात राज्यपालांचे काही योगदान नव्हते, ती भाजपच्या केंद्रीय नेत्यांची व्यूहरचना होती. त्यामुळे सत्तापरिवर्तनाचा विचार केला तर तसे कोश्यारींचे काही योगदान नाही, ते फक्त भाजपच्या इशार्‍यावर डोलत राहिले. आपल्या बेताल वक्तव्यांनी बदनाम होत राहिले. भाजपने आपला राजीनामा स्वीकारून फारच चांगले केले, असेच कोश्यारी स्वत: म्हणत असतील.

First Published on: February 13, 2023 4:03 AM
Exit mobile version