समृद्धी महामार्गाचे १ मे ला लोकार्पण

समृद्धी महामार्गाचे १ मे ला लोकार्पण

श्रेयवादाची लढाई शिवसेनेने कधी लढली नाही. जे लोकांच्या हिताचे आहे, लोकांना ज्या प्रकल्पातून फायदा होणार आहे, ते काम शिवसेनेने केले आणि ते काम महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. कामाला विरोध केला असता तर ते काम झाले नसते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शेलू असे २१० किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून येत्या १ मे ला महामार्गाचे लोकार्पण करून तो नागरिकांसाठी खुला करणार असल्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महामार्ग असून तो राज्यासाठी गेम चेंजर ठरणारा प्रकल्प आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली याचे काम सुरू झाले हे आम्ही नाकारत नाही. मात्र, त्या काळातही मी त्या खात्याचा मंत्री होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी माझ्यावर विश्वास टाकला होता. त्यानुसार या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, असे असतानाही आम्ही त्यांचे श्रेय कुठेही नाकारत नाही. सगळ्यांच्या सहकार्यातून हा महामार्ग झाला असून तो रेकॉर्ड ब्रेक वेळेत, जागतिक दर्जाचा झाला असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

नागपूर ते शेलू बाजार पेठेपर्यंत रस्ता हा 210 किलो मीटरचा आहे. तो मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या अडीच पट आहे. हा महामार्ग जनतेसाठी लोकांसाठी खुला करायचा निर्णय सरकारने घेतला असल्याने त्याचे येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तसेच शिवसैनिक कधीही लोकाभिमुख प्रकल्पाला विरोध करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: April 6, 2022 4:52 AM
Exit mobile version