भारत बंद; मुंबई,ठाणे सुरूच

भारत बंद; मुंबई,ठाणे सुरूच

मोदी सरकारच्या विरोधकांनी ८ डिसेंबर रोजी कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुरू असली तरी हा बंद आधी जाहीर झाल्याप्रमाणे होणार आहे. विशेष म्हणजे मोदी सरकारच्या विरोधकांचा ‘भारत बंद’ होणार असला तरी मुंबई अव्याहत सुरू राहणार आहे. मुंबईत रेल्वे, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी, वीज पुरवठा, पाणी पुरवठा आणि इतर जीवनावश्यक गोष्टी सुरू राहणार आहेत. तर दूध, फळे, भाजीपाला मार्केट बंद राहणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख मिरवणार्‍या मुंबईतील उपनगरीय रेल्वे, बस उपक्रमाची बस वाहतूक, रिक्षा आणि टॅक्सी या सर्व वाहतूक व्यवस्था सुरू राहणार आहे. मुंबईतील सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. वीज पुरवठा सुरू राहील. दूध, भाजीपाला, पाणी पुरवठा या सेवा सुरू राहतील. देशात महामारी कायदा लागू आहे याचे भान ठेवून वैद्यकीय सेवा तसेच औषधांची दुकानं यांना त्यांच्या कामकाजात बंदचा कोणत्याही स्वरुपाचा अडथळा होणार नाही, असे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना संकटामुळे शाळा आणि कॉलेज ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत आणि ते तसेच सुरू राहतील. यामुळे मुंबईकरांचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहू शकेल. बंद असल्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या प्रत्येक बसच्या सर्व काचांवर संरक्षक जाळ्या बसवून नंतर बस रस्त्यावर आणल्या जातील.

तृणमूल बंदमध्ये नाही
दिल्लीच्या सर्व सीमांवर उभे राहून राजधानीची एक दिवस पूर्ण कोंडी करणार असल्याचे बंदची हाक देणार्‍यांनी सांगितले. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे; पण पश्चिम बंगालमध्ये बंदला पाठिंबा देणार नाही. कारण ते पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात आहे, असे जाहीर केले.

दिल्ली एनसीआरला पंजाब, हरयाणाशी जोडणारे रस्ते बंद राहणार
दिल्ली एनसीआरला पंजाब, हरयाणाशी जोडणारे रस्ते बंद राहणार आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतून उत्तर प्रदेशला जाण्याचे रस्तेही एक दिवसासाठी बंद ठेवले जाण्याची शक्यता आहे. बंदमुळे रस्ते मार्गाने परराज्यांतून दिल्लीत आणि दिल्लीतून परराज्यांमध्ये होणार्‍या वाहतुकीवर परिणाम अपेक्षित आहे. सुरक्षेसाठी दिल्लीला परराज्यांशी जोडणार्‍या रेल्वे गाड्यांची वाहतूकही एक दिवस बंद ठेवली जाण्याची शक्यता आहे. अद्याप या संदर्भात रेल्वे प्रशासनाने सविस्तर माहिती प्रसिद्ध केलेली नाही.

बंदला मोदी सरकारच्या विरोधकांचा पाठिंबा
काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena), तेलंगणा राष्ट्र समिती (TRS), द्रविड मुन्नेत्र कळगम (DMK), समाजवादी पक्ष (Samajvadi Party), आम आदमी पक्ष (AAP), राष्ट्रीय जनता दल (RJD), बहुजन समाज पक्ष (BSP), डावे पक्ष (left parties) यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचा बंदला पाठिंबा आहे. इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (आयएनटीयुसी), ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (एआयटीयुसी), हिंद मजदूर सभा (एचएमएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीआयटीयू), ऑल इंडिया युनायटेड ट्रेड युनियन सेंटर (एआययूटीयूसी) आणि ट्रेड युनियन कोऑर्डिनेशन सेंटर (टीयुसीसी) या कामगार संघटनांनी तसेच दिल्ली टॅक्सी टूरिस्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन, दिल्ली स्टेट टॅक्सी को-ऑपरेटिव्ह सोसायटी, कौमी एकता वेल्फेअर असोसिएशन यांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

बँकेच्या कामकाजावर परिणाम
महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी महासंघाने भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. तसंच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशननेही संपाला पाठिंबा दिला आहे. ही भारतातील सर्व सरकारी बँकांची संघटना आहे.

अण्णांचे एक दिवसाचे मौन
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. यासाठी अण्णा एक दिवसाचे मौन आंदोलन करणार आहे. त्यांचे हे उपोषण पद्मावती मंदिरात होणार आहे. त्यांनी एका व्हिडिओद्वारे शेतकर्‍यांच्या मागण्यांचे समर्थन केले. कृषीमूल्य आयोगाला सरकारने स्वायत्तता द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

First Published on: December 8, 2020 6:37 AM
Exit mobile version