Khalapur : हाळ गावामध्ये आढळले दुर्मिळ खवले मांजर

Khalapur : हाळ गावामध्ये आढळले दुर्मिळ खवले मांजर

खालापूर तालुक्यातील तिसरे हाळ गावात मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अब्बास धनसे यांच्या घराच्या ओसरीवर विचित्र प्राणी आल्याची खबर अल्ताफ जळगावकर आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या हनिफ कर्जीकर यांना मिळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन अवलोकन केल्यानंतर तो प्राणी म्हणजे दुर्मिळ जातीचे खवले मांजर असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली.कर्जीकर यांनी प्राणीमित्र गुरुनाथ साठेलकर यांच्यातर्फे प्राणी अभ्यासक अभिजीत घरत यांच्याशी संपर्क साधला. घरत यांनी खवले मांजर हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्याला सावधानतेने हाताळावे, असे सूचित केले. याची माहिती तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांना देण्यात आली. पवार यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांसमवेत घरत यांना सर्व साधनसामग्रीसह घटनास्थळी दाखल होण्याच्या सूचना केल्या. तोवर त्या दुर्मिळ प्राण्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. कर्जीकर, अब्बास धनसे, अल्ताफ जळगावकर आणि जागरुक नागरिकांनी सावधानता बाळगत वन खात्याचे कर्मचारी येईपर्यंत मांजराजवळ कोणाला जाऊ न देता त्यावर पाळत ठेवली होती.

घरत आणि वन खात्याचे कर्मचारी तेथे दाखल झाल्यानंतर त्यांनी त्या खवले मांजराची संपूर्ण शारीरिक तपासणी केली असता त्याच्या अंगाला लागलेला चिखल आणि मातीत माखलेली नखे यावरून ते वाट चुकून शिकारीच्या शोधात त्या ठिकाणी आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याला कोणतीही जखम झाली नव्हती याची खात्री करून त्यांनी त्याला सुरक्षित पिंजर्‍यात बंद करण्यात येऊन वन खात्याने ताब्यात घेतले

खवले मांजर या प्रजातीला धोका निर्माण झाला आहे. सद्यःस्तिथीत त्याची नोंद आययुसीएन रेड लिस्टप्रमाणे ‘धोका असलेली प्रजाती’ आहे. त्यांच्या जीविताला धोका असल्याने तिसर्‍या हाळमधील जागरुक नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दुर्मिळ प्रजातीला वाचविल्याबद्दल खालापूर तालुका वन अधिकारी राजेंद्र पवार आणि आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामजिक संस्थेने सर्वांचे कौतुक केले आहे.

खवले मांजर हे फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी असून, आशिया आणि आफ्रिका खंडात सापडतो. हे प्राणी शक्यतो पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतात. खवले मांजर निशाचर असून, त्यांचा आहार प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी आहे. सहसा हा प्राणी एकटा राहतो आणि केवळ प्रजननासाठी नर-मादी भेटतात. हल्ली खवले मांजराची मांसासाठी शिकार केली जाते. सुरक्षित वन क्षेत्र कमी झाल्याने ते मानवी वस्तीत आढळते.
-अभिजीत घरत, प्राणी अभ्यासक


हे ही वाचा – … तर बेस्ट कर्मचाऱ्यांचे उग्र आंदोलन, बेस्ट उपक्रम बंद पडणार – भाजपाचा इशारा


 

First Published on: October 21, 2021 8:38 PM
Exit mobile version