खोपोली – मुंबई लोकल सुरू, प्रवाशांना दिलासा

खोपोली – मुंबई लोकल सुरू, प्रवाशांना दिलासा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 24 मार्च पासून रेल्वे सेवा बंद केली. अनलॉक अंतर्गत लोकल सेवा सुरू झाली. मात्र, खोपोली-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकल बंदच होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ही लोकल सुरु करावी अशी मागणी विविध रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर प्रवाशांच्या या मागणीला यश येऊन सोमवारपासून खोपोली ते मुंबई (सीएसटी) या मार्गावरील लोकल सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे खोपोली एमआयडीसीत येणार्‍या कामगारांची त्याच बरोबर खोपोलीतून मुंबई उपनगरात जाणार्‍या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.

कर्जत मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत-खोपोली मार्गावर 25 मार्चपासून प्रवासी सेवेची वाहतूक बंद होती. त्यानंतर सोमवारी या मार्गावर कोरोना अनलॉकमध्ये उपनगरीय लोकल सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, लोकल सेवा सुरू झाल्याने खोपोली आणि खालापूर औद्योगिक वसाहतीत काम करणार्‍या तरुणांचा वाहतूक व्यवस्था नसल्याने हिरावून गेलेला रोजगार मिळू शकणार आहे. कर्जतपासून खोपोली मार्गावर लोकल सेवा चालवली जाते. खोपोली आणि खालापूर भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असल्याने कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावातील कामगार नोकरीसाठी कर्जत-खोपोली लोकलने प्रवास करून जात होते.

मात्र, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय लोकल सेवा बंद करण्यात आली होती. मागील काही महिने अत्यावश्यक सेवेमधील कामगार वर्गासाठी उपनगरीय लोकलसेवा सुरू झाल्या आहेत. त्यात कर्जतपासून मुंबई सीएसएमटी अशी लोकल सेवा सुरू झाल्या आहेत आणि दुपारच्या वेळी सरसकट सर्व महिला प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कोरोना काळात कर्जत खोपोली मार्गावर लोकल सेवा सुरू करण्यात आली नव्हती. त्यामुळे कामगार वर्ग आणि मोलमजुरी करणारा वर्ग तसेच महिला यांच्याकडून सातत्याने कर्जत-खोपोली मार्गावर उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर सोमवारी कर्जत येथून पहाटे पावणे पाच वाजता खोपोलीकरिता पहिली लोकल धावली. कर्जत-खोपोली मार्गावर ज्याप्रमाणे उपनगरीय लोकलची वाहतूक असायची त्याच वेळापत्रकानुसार उपनगरीय लोकलसेवा सुरू झाली आहे.

First Published on: November 4, 2020 6:15 AM
Exit mobile version