….अन्यथा मेट्रोची ट्रायल नाही – आमदार प्रशांत ठाकूर

….अन्यथा मेट्रोची ट्रायल नाही – आमदार प्रशांत ठाकूर

....अन्यथा मेट्रोची ट्रायल नाही - आमदार प्रशांत ठाकूर

नवी मुंबईत मेट्रो रेल्वेची आखणी सुरू करतेवेळी सिडकोने प्रकल्पग्रस्तांना या रेल्वेत रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. आता सिडको हात वर करत असेल तर रोजगार मिळाल्याशिवाय मेट्रोची ट्रायल होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे.रोजगाराच्या मागणीसाठी बुधवार २५ ऑगस्ट या दिवशी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंंदोलनाच्या निमित्ताने मोठ्यासंख्येने प्रकल्पग्रस्त जमा झाले होते. जोरवर रोजगारासंबंधी सिडको लेखी आश्वासन देत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहील, असेही आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले.

२०१५ पासून या प्रकल्पातील रोजगाराबाबत पाठपुरावा केला जातो आहे. मेट्रो रेल्वेची बहुतांश कामे पूर्ण झाली असल्याने आता सिडकोने रोजगाराबाबत निर्णय घेतला पाहिजे, असे प्रशांत ठाकूर म्हणाले. या प्रकल्पामध्ये नागपूरहून भरती केली जात असल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला. स्थानिकांना डावलून प्रकल्प उभारला जाणार असेल तर मेट्रो कदापि सुरू होणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यामागणीवर सिडकोकडून सतत वेळकाढू धोरण अवलंबले जात असल्याबद्दल त्यांनी नापसंती व्यक्त केली. अखेर आंदोलनाचा मार्ग हाती घेण्यात येऊन काल तळोजा येथील मेट्रोरेल्वे कारशेडसमोर निदर्शने करण्यात आली.

पोलिसांनी मध्यस्थी करुन आंदोलकांना चर्चेस पाचारण केले. पण लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केले. आदोलन सुरू होऊनही कोणीही अधिकार दाद देईनात असे पाहून आंदोलक आक्रमक झाले. आणि काहीजण कारशेडमध्ये घुसले. कारशेडमध्ये घुसलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. तुमचे गेट बंद असले तरी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना इतर मार्गही माहीत असल्याचा सूचक इशारा प्रशांत ठाकूर यांनी दिला. आमच्या महिला- भगिनी घरात करमणूक नाही म्हणून येथे उन्हातान्हात बसलेल्या नाहीत. आमच्या नगरसेवकांना दुसरे काम नसल्याने येथे आलेले नाहीत.

आमच्यावर गुन्हे दाखल करताना पोलीस कोविड प्रोटोकॉल मोडल्याचाही गुन्हा दाखल करतील. मग ज्या सिडको आणि मेट्रो अधिकार्‍यांमुळे आम्हाला आंदोलन करावे लागले त्यांच्यावरही पोलीस कोविड प्रोटोकॉल मोडल्याचे गुन्हे दाखल करणार काय, असा सवाल यावेळी केला जात होता.

स्थानिकांना डावलून परस्पर बाहेरील उमेदवारांना रोजगार देण्याचा सिडकोने आगाऊपणा केला आहे. हे असेच होणार असेल तर विमानतळाचा प्रकल्प अजून व्हायचा आहे, याची जाणीव सिडकोने ठेवावी. आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आणि आमच्याकडे तुम्हाला हवेत ते उमेदवार आहेत, असे असताना डावलून कोणी इतरांना रोजगार देत असेल, तर आम्ही कदापि चालवू देणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – म्हाडा मुंबई मंडळाकडे विक्रमी अधिमुल्य महसूल जमा – गृहनिर्माण मंत्री आव्हाड


 

First Published on: August 25, 2021 8:41 PM
Exit mobile version