नगर-मनमाड हायवेचे काम १५ दिवसांत सुरू होणार

नगर-मनमाड हायवेचे काम १५ दिवसांत सुरू होणार

शिर्डी – पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, नाशिक, धुळे या शहरांसह अनेक राज्यांना जोडणाऱ्या नगर – मनमाड महामार्गाची अक्षरशः दूरवस्था झाली आहे. मात्र, आता लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिर्डी येथे दिली आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी गुरुवारी शिर्डीच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी या संदर्भात माहिती दिली. गेल्या अनेक वर्षापासून नगर-मनमाड हायवेची मोठी दूरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. हा राज्य महामार्गा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर त्यासाठी ४९० कोटी रुपयांचे कंत्राट देऊनही रस्त्याचे काम सुरू होत नव्हते. याबाबत पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यावर गडकरींनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, नगर-मनमाड रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला आहे. येत्या १५ दिवसांत रस्ता बांधकामाला सुरुवात करून एक वर्षात ‌हे काम पूर्ण होईल, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.

खासदार डॉ. सुजय विखे-पाटील अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत आहेत. गडकरी यांनी केलेल्या या घोषणेमुळे या महामार्गाचे शुक्लकाष्ट संपणार आहे.

First Published on: October 28, 2021 9:22 PM
Exit mobile version