Panvel : लाभाचे आमिष दाखवून १० लाखाला गंडा

Panvel : लाभाचे आमिष दाखवून १० लाखाला गंडा

पेडोंरा अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या नोकरी करून जास्त लाभ मिळविण्याचे आमिष दाखवून एका सायबर चोरट्याने तालुक्यातील डेरवली येथील तरुणाला तब्बल १० लाख १८ हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.फसवणूक झालेला तरुण सनाउल्ला जबीउल्ला खान (२५) मुंब्रा येथे राहण्यास असून, डेरवली येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. खान कामावर असताना अज्ञात सायबर चोरट्याने विनीता या महिलेच्या नावाने त्याला घरी बसून नोकरी करा आणि मिळणार्‍या लाभाचा फायदा घ्या, अशा प्रकारचा व्हॉट्सअ‍ॅपवरुन मेसेज पाठविला. सदर मेसेजला खान याने प्रतिसाद दिल्यानंतर चोरट्याने त्याला लिंक पाठवून दिली. लिंक उघडण्यात आल्यानंतर पेडोंरा नावाचे अ‍ॅप सुरू झाल्याचे आणि त्यात ८८ रुपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले.

चोरट्याने सांगितल्यानुसार खान याने २०० रुपयांचे रिचार्ज केल्यानंतर अ‍ॅपवर ३६० रुपयांच्या ३ खरेदीच्या ऑर्डर त्याला प्राप्त झाल्या. खरेदीवर कमिशन म्हणून ५४ रुपये मिळणार असल्याने त्याने सदर ऑर्डर खरेदी केल्या. त्यानंतर त्याच्या पेडोंरा अ‍ॅपच्या अकाऊंटवर खरेदी किंमतीसह ५४ रुपये कमिशन जमा झाले. यानंतर खान याला मोठ्या रकमेच्या ऑर्डर पाठवून त्या खरेदी केल्यानंतर त्याच्या अकाऊंटमध्ये मोठी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. त्याच्या खात्यात ५२ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्यानंतर चोरट्याकडून त्याला कमिशनची रक्कम काढून घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे खान याने रक्कम काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र सदर रक्कम न निघाल्याने चोरट्याने त्याला कमिशनच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम अकाऊंटवर रिचार्ज करण्यास सांगितले. त्यानंतर देखील सदर रक्कम त्याला काढता येत नव्हती. दुसरीकडे मोठमोठ्या रकमेच्या ऑर्डर पाठवून त्याला त्या खरेदी करण्यास भाग पाडायचे आणि त्याच्या खात्यात कमिशन म्हणून मोठी रक्कम दाखवायची, अशा पद्धतीने खान याच्या पेडोंरा खात्यात १८ लाख रुपये कमिशन जमा झाल्याचे दाखविले. मात्र ही रक्कम काढण्यासाठी गेल्यास त्याला २५ ते ३० टक्के रक्कम भरण्यासाठी सांगितले जायचे. अशा पद्धतीने खान याने कमिशनची रक्कम काढण्यासाठी तब्बल १० लाख १८ हजार रुपयांची रक्कम अकाऊंटमध्ये भरली. तरीही कमिशनची रक्कम निघत नसल्याने त्याने सायबर चोरट्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने राँग नंबर असल्याचे सांगून फोन बंद केला.
त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे त्याच्या लक्षात येताच खान याने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस तपास सुरू आहे.


हे ही वाचा – राज्यातील मागास तालुक्यातील नागरीकांना रोजगाराच्या समान संधी उपलब्ध होणार – अजित पवार


 

First Published on: December 2, 2021 9:52 PM
Exit mobile version