पनवेलमध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या उद्योगांना पोलिसांची साथ

पनवेलमध्ये बेकायदेशीर सुरू असलेल्या उद्योगांना पोलिसांची साथ

बेकायदेशीर सुरू असलेल्या उद्योगांना पोलिसांची साथ ; लेट डान्स बारवर कधी होणार कारवाई

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील हॉटेल आणि डान्स बार रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या आदेशाला केराची टोपली दाखवत परिसरातील बहुतेक डान्स बार हे रात्री उशिरापर्यंत सुरुच असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा हॉटेल आणि बार विरोधात पोलिसांसह पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून यांच्यामुळे वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवावा अशी मागणी परिसरातील रहिवाशी करीत आहेत.

दुकाने, हॉटेल, बार आणि पब, हुक्का पार्लर आदी रात्री १० वाजल्यानंतर सुरू ठेवण्यास विशेष अधिसूचनेनुसार मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही शहरातील अनेक हॉटेल, डान्स बार, पब, हुक्का पार्लर हे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. नियमांचे उल्लंघन करणार्‍या अशा अस्थापनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक सुद्धा कार्यरत असून त्यांनी नुकतेच पनवेल व तळोजा परिसरात अशा प्रकारच्या डान्स बार वर कारवाई केली आहे. मात्र शहरातील अनेक असे बार स्थानिक पोलिसांच्या साथीने रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची बाब उजेडात आली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कित्येक ठिकाणी बारच्या मुख्य दरवाजाची लाईट घालवून मागील दरवाज्याच्या बाजूने हे बार सुरू असतात.

अशा बारच्या ठिकाणी कारवाईला अर्थपूर्ण बगल दिली जात असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. मुख्यत्वे करून कोरोना विषाणूचे सर्वाधिक उल्लंघन अशा प्रकारच्या बार, पब व हुक्का पार्लरमध्ये होत आहे. या ठिकाणी वेळेचे बंधन पाळले जात नाही. नियम धाब्यावर बसवून अशा रात्री उशिरापर्यंत चालणार्‍या बार, पब आणि हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.


हे ही वाचा – CNG : केंद्र सरकारने गॅसच्या किंमती वाढवल्या; सीएनजीचे दर वाढणार


 

 

First Published on: October 1, 2021 3:24 PM
Exit mobile version