राम मंदिराची तारीख विचारणारे नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत

राम मंदिराची तारीख विचारणारे नाईलाजाने टाळ्या वाजवताहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर टीका

राम मंदिराची तारीख विचारणारे आता नाईलाजाने टाळ्या वाजवत आहेत. गेल्या अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आता राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झाले आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या टीकाकारांना हाणला. बुधवारी बिहारमधील दरभंगा येथे आयोजित रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, प्रत्येक शेतकर्‍याच्या थेट बँक खात्यात आम्ही मदत पोहोचवणार आहोत. आतापर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

आज जवळपास 40 कोटी गरिबांची बँक खाती उघडली आहेत. आम्ही उज्ज्वला योजनेचीही घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत बिहारमधील जवळपास 90 लाख महिलांना लाकडाच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, मोफत उपचार देण्याची घोषणाही केली होती. आज बिहारच्या प्रत्येक गरीब व्यक्तीला याचा लाभ मिळत आहे. कोरोनाच्या संकटात गरिबांना मोफत अन्नधान्य देणार असल्याचे म्हटले होते. ते देखील होत आहे, असे देखील मोदी यांनी सांगितले.

सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना ‘व्होकल फॉर लोकल’चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा, असे आवाहन मोदी यांनी केले. जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो. तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येते की, बाजारात कधी जायचं? नेमकी काय काय खरेदी करायची. विशेषत: लहान मुलांमध्ये याबाबत मोठा उत्साह असतो. मात्र, यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा व्होकल फॉर लोकलचा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना, आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत, त्यात आपला विजय देखील निश्चित आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

First Published on: October 29, 2020 6:23 AM
Exit mobile version