राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन

राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन

सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन देऊन केली होती. मात्र, राज्यपालांनी याबाबत राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर शुक्रवारी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवार यांनी स्वत: राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती दिली आहे. मला राज ठाकरे यांचा फोन आला. यावेळी राज्यपाल भेटीबाबत राज ठाकरेंनी चर्चा केल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मी आज दौर्‍यावर जात असल्यामुळे राज ठाकरेंसोबत भेटण्याबाबत अजून काही ठरले नसल्याचेही शरद पवारांनी यावेळी सांगितले.

मुंबईसह, राज्यातील नागरिकांना येणारी विजेची भरमसाठ बिले आणि राज्यातील इतर समस्यांबद्दल राज ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच त्यांना एक निवेदनही सादर केले. राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला देण्यात आल्याचे राज ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सरकारमध्ये शरद पवारांचे ऐकले जाते. त्यामुळे आपणही शरद पवारांशी एकदा बोला. मी सरकारला पत्र पाठवेन; पण त्यावर सरकार काही करेल का, याबद्दल मला शंका आहे. म्हणून आपण शरद पवारांशी बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तरीही मी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी बोलेन आणि जे काही करता येईल ते निश्चित करेन, असे राज्यपालांनी राज ठाकरेंना सांगितले होते.

First Published on: October 31, 2020 6:50 AM
Exit mobile version