नाताळसाठी वसईकर सज्ज कोरोनामुळे जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध

नाताळसाठी वसईकर सज्ज कोरोनामुळे जाहीर कार्यक्रमांवर निर्बंध

वसईत नाताळ व येणार्‍या नववर्षाची स्वागत तयारी पूर्ण होत आलेली आहे. गावातील घरे तसेच चर्च परिसर विद्युत रोषणाईने उजळलेला आहे. केक, डोनट्स, फुगे, विविध मिठाई प्रकारांबरोबर दिवाळी सारखेच घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी आदी पदार्थ बनवले जात आहेत. मित्रवर्गाकडून दिवाळीनिमित्त आलेल्या फराळाची परतफेड नाताळच्या काळात ख्रिस्ती बांधव करीत असतात. यंदा कोरोनाचे सावट असल्याने कार्निव्हल, विविध स्पर्धा, स्नेहभोजन, सांस्कृतिक कार्यक्रम यावर निर्बंध असणार आहेत.

वसईचे आर्चबिशप फेलिक्स मच्याडो यांनी नाताळ आणि नववर्षानिमित्त होणार्‍या कार्यक्रम तसेच प्रार्थना, मिस्साबाबत नियमावली प्रसिद्ध केली आहे. नाताळच्या पूर्वसंध्येला होणारी जागरण प्रार्थना, मिस्सा ही सायंकाळी ६ व रात्री ७.३० ला होणार आहेत. मोठी लोकसंख्या असलेल्या धर्मग्रामासाठी दोन व लहान धर्मग्रामासाठी एक अशा मिस्सा होणार आहेत.

नाताळच्या दिवशी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत गरजेनुसार तसेच लोकसंख्येनुसार मिस्सा आयोजित करण्यात येतील. यात नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. कॅरल गायनावर बंदी घालण्यात आली आहे. तर नाताळ काळात पापनिवेदनावर भर असतो, त्यातही गरजेनुसार व निकडीच्या प्रसंगानुसार नियमाचे पालन करून करता येईल.

नाताळच्या मध्यरात्रीच्या पूर्वसंध्येला चर्चमध्ये मिस्सा यंदा होणार नाहीत. नववर्षाच्या स्वागताला सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत गरजेनुसार मिस्सा आयोजित करण्यात येतील. मात्र, याच दिवशी देव मातेचा सोहळा असल्याने सायंकाळी ०५.३० तसेच ०७.३०ला विशेष मिस्सा असतील. एकंदरीत नाताळची तयारी पूर्ण होताना दिसत आहे. सोळाव्या शतकापासून जर का इतिहास पाहिला तर मराठ्यांनी मिळवलेल्या विजयानंतरही मराठा सैन्य नाताळनिमित्त वसई किल्ल्यामध्ये घोडेस्वारी करून सलामी देत असे. धर्मांतरे झाली, पोशाख बदलले. मात्र, संस्कृती तसेच पाककला वारसा आजही वसईत पहावयास मिळत आहे.

…तरीही कॅरल गायन सुरूच
आर्च बिशपांनी जरी कॅरल गायनावर बंदी घातली असली तरी काही खासगी युवक संघटनांनी गावोगावी जाऊन नाताळ गीते साजरी करणे सुरूच ठेवली आहेत. याला लोकांचाही प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आर्च बिशपांच्या फतव्याला विशेष गंभार्‍याने घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे.

चर्च परवानगीविना गोठा स्पर्धा
चर्चचे नाव घेऊन काही राजकीय तसेच सामाजिक संस्था भाविकांची दिशाभूल करून नाताळ गोठा स्पर्धा आयोजित करीत आहेत. या संघटनांचा चर्चशी कुठलाच संबंध तसेच चर्चने अशी कुठलीच परवानगी दिली नसल्याचे आर्च बिशपानी स्पष्ट केले आहे. सांडोर चर्चचे नाव घेऊन गावोगावी काही लोक लकी ड्रॉ, गोठा स्पर्धा आयोजनाचे प्रवेश अर्ज घेऊन फिरत आहेत. तसेच अशा स्पर्धांचे निकाल चर्चमधून घोषित करण्यात येतील असेही म्हटले गेले असल्याचे कळते.

First Published on: December 23, 2020 6:37 AM
Exit mobile version