फडणवीस-राऊत भेटीवरून पराचा कावळा आघाडी सरकारला धोका नाही – पवार

फडणवीस-राऊत भेटीवरून पराचा कावळा आघाडी सरकारला धोका नाही – पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार

‘सामना’साठी आपली मुलाखत घेण्यात आली तेव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याचे निश्चित झाले होते. ही मुलाखत होणार असल्यास त्यात वावगे ते काय? संजय राऊत आणि फडणवीस यांच्यातील भेटीच्या होत असलेल्या चर्चेचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकारणातील समीकरणे बदलण्याची शक्यता साफ धुडकावून लावलीच शिवाय राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कोणताही धोका नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय धुरळा उडाला होता. राज्यातील सत्तेची समीकरणे बदलण्याची जोरदार चर्चा सुरू होती. समाज माध्यमांनी तर महिनाभरात राज्यात राजकीय बदल घडण्याचे सुतोवाचही केले होते. या पार्श्वभूमीवर पवारांनी आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले.

आपली मुलाखत ‘सामना’साठी घेण्यात आली तेव्हाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्याची भेट घेतली जाणार असल्याचे राऊत यांनी आपल्याला सांगितले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची मुलाखत पार पडली. पण येन केन कारणाने भाजप नेत्यांची मुलाखत कदाचित लांंबणीवर पडली असावी. या निमित्ताने राऊत आणि फडणवीस यांची भेट झाली असल्यास त्यात वावगे काय, असा सवाल पवारांनी केला. यावरून पराचा कावळा करण्यात आल्याचे सांगताना पवारांनी राज्यातील आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, असे स्पष्ट केले.

देशाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी केंद्र सरकारने अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. हा तपास करण्यासाठी आपल्या अखत्यारातील संस्थांना कामाला लावले आणि त्यातून काहीच बाहेर आले नाही. ज्या कारणासाठी यंत्रणांना कामाला लावण्यात आले ते मागे राहून तपास इतर दिशेने सुरू आहे. यावरून केंद्राचा हेतू स्पष्ट झाल्याचे पवार म्हणाले. एका प्रश्नाच्या उत्तरात पवार यांनी खासदारकीसाठी छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती उदयनराजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. यामुळे दोन्ही राजांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडूनच सोडवून घ्यावा, अशी कोपरखळी मारली. रिपाइं नेते आणि केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या सूचना आता बेदखल होऊ लागल्या आहेत. आठवले यांच्या पक्षाचा एकही आमदार आणि खासदार नाही. त्यांचे बोलणेही आजकाल कोणी गंभीरपणे घेत नाही. यामुळे त्यांच्या सूचनांना फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

First Published on: September 30, 2020 6:50 AM
Exit mobile version