वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

कां आपुला ठावो न सांडितां / आलिंगिजे चंदु प्रगटतां / हा अनुराग भोगितां / कमुदिनी जाणे //
किंवा चंद्रप्रकाश होण्याबरोबर चंद्रविकासिनी कमलिनी उमलून आपली जागा न सोडता ज्याप्रमाणे चंद्राला प्रीतीने
आलिंगन दण्याचे सौख्य जाणते.
ऐसेनि गंभीरपणें / स्थिरावलोनि अंतःकरणें / आथिला तोचि जाणे / मानूं इये //
त्याप्रमाणे गांभीर्याने ज्याचे मन स्थिर झाले आहे, तोच या कथेचे रहस्य जाणतो व त्याला आम्ही मानतो.
अहो अर्जुनाचिये पांती / जे परिसणेया योग्य होती / तिहीं कृपा करूनि संतीं / अवधान द्यावे //
अहो अर्जुनाच्या योग्यतेचे जे श्रवण करणारे असतील, त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे.
हें सलगी म्या म्हणितलें / चरणांलागोनि विनविलें / प्रभू सखोल हृदय आपुले / म्हणौनियां //
प्रभू आपले हृदय फार गंभीर आहे. म्हणून माझी आपल्या चरणापाशी लडिवाळपणाने ही विनंती आहे.
जैसा स्वभवो मायबापांचा / अपत्य बोले जरी बोबडी वाचा / तरी अधिकचि तयाचा / संतोष आथी //
ज्याप्रमाणे आपले मूल बोबडे बोलले तरी आई-वडिलांना त्याचा स्वभावतःच अधिक संतोष वाटतो.
तैसा तुम्हीं मी अंगिकारिला / सज्जनीं आपुला म्हणितला / तरी उणें सहजें उपहासला / प्रार्थू कायी //
त्याप्रमाणे माझा तुम्ही सज्जनांनी अंगीकार केला असून ज्या अर्थी मला आपला म्हटले आहे, त्या अर्थी माझे जे काही उणे असेल ते तुम्ही सहज सहन कराल त्याबद्दल मला आपली प्रार्थना केली पाहिजे असे नाही.
परी अपराधु तो आणिक आहे / जें मी गीतार्थु कवळूं पाहें / ते अवधारा विनवूं लाहें / म्हणौनियां //
परंतु जो अपराध म्हणून माझ्या हातून घडत आहे, तो निराळाच आहे, तो गीतेचा अर्थ मी स्पष्ट करू पाहत आहे आणि इकडे लक्ष द्या अशी तुम्हाला विनंती करू पाहत आहे.

First Published on: January 10, 2023 4:53 AM
Exit mobile version