मुंबईप्रमाणेच ठाण्यातही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच!

मुंबईप्रमाणेच ठाण्यातही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई महानगर पालिकेने शुक्रवारी दुपारी मुंबईतील सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यातल्या सर्व शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली असतानाच स्थानिक परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता मुंबई आणि ठाण्यातल्या शाळा थेट पुढच्या वर्षीच उघडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

हरियाणामध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करताच अनेक विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं होतं. राजधानी दिल्लीमध्ये देखील कोरोनाची परिस्थिती पुन्हा चिघळू लागली आहे. हे पाहाता मुंबई महानगर पालिका प्रशासनाने सतर्कतेचा उपाय म्हणून शाळा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता ठाणे जिल्ह्यासाठी देखील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच आदेश दिले आहेत.

तत्पूर्वी, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यात ९वी ते १२वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती पाहाता हे वर्ग सुरू करणं शक्य होणार आहे किंवा नाही, यासंदर्भातला निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यावा, असं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये शाळा सुरु होण्याची, मात्र काही भागांमध्ये शाळा बंदच राहण्याची शक्यता आहे.

First Published on: November 20, 2020 6:30 PM
Exit mobile version