पालकांची संमती असेल तरच शाळा उघडणार !

पालकांची संमती असेल तरच शाळा उघडणार !

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनलॉकची प्रक्रिया सध्या सुरू झाली आहे. उद्योगधंदे, रेस्टॉरंट, हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. पण शाळा कधी सुरू होणार हा लाखमोलाचा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. मात्र, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शाळा उघडण्याबाबत तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, त्याचे उत्तर आता पालकच देणार आहेत. पालकांची संमती असेल तर शाळा सुरू होणार आहेत, अन्यथा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय कायम राहणार आहे.

देशातील काही राज्यांमध्ये येत्या १५ ऑक्टोबरपासून शाळा उघडणार आहेत. मात्र, या शाळा सुरू करताना कोणत्या नियमांचे पालन करावे, याच्या मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने सोमवारी जाहीर केल्या आहेत. या नियमांचे पालन करणे प्रत्येक शाळा व्यवस्थापनाला बंधनकारक असणार आहे. त्यानुसार, पहिली अट ही शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांची लेखी संमती आवश्यक आहे. पालकांची लेखी संमती नसेल तर विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाही. त्यामुळे शाळेत आपल्या पाल्याला पाठवायचे की नाही, याचा निर्णय पालकांनाच घ्यावा लागणार आहे.

पालकांनी लेखी संमती दिली नाही तर विद्यार्थी शाळेत येऊ शकणार नाहीत आणि शाळा सुरूच होणार नाहीत. पुन्हा विद्यार्थ्यांनी नेहमीच शाळेत हजर राहायला हवे, ही अटही काढून टाकली आहे. उलट कधी हजर राहायचे आणि कधी नाही, याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

देशातील शाळा १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरू करण्यात येतील. शाळा सुरू करण्याबाबतची मानके ही राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची मार्गदर्शक तत्वे
१)पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात
२) विद्यार्थ्यांना शाळेत हजर राहण्याबाबत मुभा देण्यात आली आहे
३) विद्यार्थ्यांनी शाळेत येण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीने अभ्यास करण्याचे आवाहन

First Published on: October 6, 2020 6:38 AM
Exit mobile version