सर्वसामान्य विमलची असामान्य जिद्द!

सर्वसामान्य विमलची असामान्य जिद्द!

विमल पांडुरंग शिंदे

मी विमल पांडुरंग शिंदे. गेली २७ वर्षे मी खानावळ चालवत आहे. सुरुवातीला आपल्याला हे काम जमेल की नाही अशी धाकधुक होती; पण कुटुंबाचा भार होता. यामुळे मनाशी पक्के ठरवले आणि खानावळ सुरू केली. सुरुवातीला ४ ते ५ जणांचे डबे बनवून देण्याचे काम मिळाले. यामुळे आत्मविश्वास वाढला. नंतर ५ डब्यांवरून १५ डबे झाले. यादरम्यान, आमचं झोपडं तुटलं. त्यामुळे दोन्ही मुलांना घेऊन दुसरीकडे राहण्यास गेलो. नवर्‍याचा इस्त्रीचा धंदा होता. माझी खानावळ आणि त्यांच्या कामावरच घर चालत होतं. त्यावरच मुलांचं शिक्षण पूर्ण केलं.

पण सगळं सुरळीत सुरू असतानाच २०१३ साली नवर्‍याला किडनीचा विकार जडला. त्यांच्या किडनीला सूज आली. त्यामुळे इस्त्रीचा धंदा बंद करावा लागला. त्यांच्या उपचारांसाठी पैशांची कमतरता जाणवत होती. म्हणून जास्तीत जास्त डबे मिळवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू नवर्‍याच्या तब्येतीत सुधारणा होत गेली. यामुळे त्यांनी सिक्युरिटीचे काम करण्यास सुरुवात केली. पण २०१७ साली आमच्यावर पुन्हा एकदा आभाळ कोसळलं. नवर्‍याला पॅरेलिसिसचा अटॅक आला. घर, मुलं आणि हॉस्पिटल यात माझी पुरती धावपळ व्हायची. पण कुटुंबाची साथ होती. मात्र, उपचाराचा खर्च भागवणे हा मोठा प्रश्न होता. यामुळे खानावळ चालू ठेवणे गरजेचे होते. मला माणसंही चांगली मिळाली. ज्यांनी माझ्याकडे खानावळ लावली होती, त्यांनी आगाऊ पैसे दिले. तर अनेकवेळा मी खानावळीत असताना ते माझ्या नवर्‍याजवळ हॉस्पिटलमध्ये जाऊन थांबत. मुलंही मोठी होत गेली. काळ जात होता.

२८ जानेवारी २०१८ ला नवर्‍याचे निधन झाले. माझा आधार गेला. मुलं मोठी होती तरी कमावती नव्हती; पण परिस्थितीमुळे ती खंबीर बनली होती. नवर्‍याचे बारावे केल्यानंतर १४ व्या दिवशी मी पुन्हा खानावळ सुरू केली. रडत बसायला वेळ नव्हता. मुलांना वाढवण्याचं आव्हान होतं. हिंमत नाही हरले. माहेर पाठीशी होतंच. आजही मी खानावळ चालवते. मुलं मदत करतात.

कोरोनाचं संकट आलं. खानावळ काही महिने ठप्प झाली. लोक गावी गेली होती. यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली. लॉकडाऊनमध्ये तर भाजीपाला महाग झाला. यामुळे दोन पैसे वाचवण्यासाठी दोघी-तिही एकत्रच भाजी खरेदी करण्यासाठी जात होतो. यादरम्यान ४, ५ डब्यांचं काम मिळालं. भाज्या महाग झाल्याने कडधान्य डब्यात देऊ लागले. पण लोकांनी कधी तक्रार केली नाही. सध्या खानावळीवर देखील वाईट परिस्थिती आली आहे. काही जणांचा पगार कमी झाला आहे तर काहींना काम देतो म्हणून मुंबईत बोलून घेऊन काम दिलंच नाही. आता हे सगळं लक्षात घेऊनच खानावळीचे पैसे घ्यावे लागतात. मी एक महिन्यासाठी दोन वेळच्या जेवणाचे २,८०० रुपये घेते. आता आमच्याकडे १४ खानावळी आहेत.

लॉकडाऊन झाल्यानंतर खानावळी गावी गेल्यानंतर इथून पुढे कसं जगायचं, कसं राहायचं असे अनेक प्रश्न मनात घोंघावत राहिले. अशा परिस्थितीत एका माणसाने जरी डबा मागितला तरीही त्याला डबा देत होती. कधी कधी माझा मुलगा बिल्डिंगच्या खाली जाऊन डबा देत होता; पण अनलॉक सुरू झाल्यानंतर खानावळी पुन्हा येऊ लागल्यानंतर मला थोडा आधार वाटला. लॉकडाऊन काळात काटकसरीने घर कसंबसं चालवलं. जेव्हा खानावळी नव्हते तेव्हा मी माझ्या घरघंटीवर आमच्या बिल्डिंगमधले दळण घेऊ लागले. माझ्या मुलीच्या तुटपुंज्या पगारावर घर चालवू लागले. मी आणि माझी मुलं कधी एकवेळेच्या जेवणात डाळभात तर कधी भाजी-चपाती खाऊन राहात होतो. त्यामुळे थोडीफार पैशाची बचत झाली; पण अनलॉक नंतर सगळं काही सुरळीत सुरू झालं. आता आम्ही कोरोना संदर्भातले जे नियम आहेत, त्याचे पालन करून सर्वांना डबे देत असतो.

शब्दांकन : प्रियांका शिंदे

First Published on: October 20, 2020 6:59 AM
Exit mobile version