EMI ३ महिने पुढे ढकलत आहात? द्यावे लागेल अतिरीक्त व्याज

EMI ३ महिने पुढे ढकलत आहात? द्यावे लागेल अतिरीक्त व्याज

EMI भरण्यासाठी तीन महिन्यांची स्थगिती दिली असली तर कर्जदारांना याचा विशेष लाभ मिळणार नाही. कारण रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार या स्थगितीच्या बदल्यात नंतर व्याज वसूल केले जाणार आहे. मागच्या आठवड्यात शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने सगळे रिटेल, पिक कर्ज आणि सर्व प्रकारच्या टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटलचे हप्ते तीन महिन्यांसाठी स्थगित केले होते.

मात्र आता समोर आलेल्या नव्या माहितीनुसार कर्जदारांना यामुळे दुहेरी फटका बसणार आहे. एकतर लॉकडाऊनमुळे लोकांच्या मिळकतीवर विपरीत परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेने दिलेली सूट घेतली तर कर्जाच्या हप्त्यांचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना सूचित केले आहे की, टर्म लोनच्या उरलेल्या हप्त्यांवर स्थगितीच्या काळात देखील व्याज लागणार आहे. तीन महिने स्थगितीचा पर्याय जे लोक निवडणार आहेत, त्यांचे ईएमआय वाढवून ते व्याज वसूल केले जाणार आहे.

एसबीआयने आपल्या वेबसाईटवर याची सविस्तर माहिती दिली आहे. ३० लाखांचे कर्ज चुकविण्यासाठी ज्यांनी १५ वर्षांचा कालावधी निवडला आहे. त्यांचे एकूण कर्जावरील व्याज २.३४ लाख होते. जे की आठ ईएमआयच्या बरोबर होते. बँकेने सांगितले आहे की, ज्यांनी सहा लाखांचे वाहन कर्ज घेतले असून मॅच्युरिटी ५४ महिन्यांची आहे, अशा कर्जदारांना १९ हजारांचे अतिरीक्त व्याज द्यावे लागेल. जे की १.५ अतिरीक्त ईएमआय एवढे असेल.

तसेच जे कर्जदार ईएमआय तीन महिने पुढे न ढकलता वेळेवर भरण्यासाठी तयार आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. तसेच ज्यांना ईएमआय पुढे ढकलण्याचा पर्याय निवडायचा आहे. त्यांनी NACH Extension च्या अधिकृत ईमेल आयडीवर जाऊन अर्ज करावा.

First Published on: April 1, 2020 8:52 PM
Exit mobile version