भिवंडीतून ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक; बनावट पासपोर्ट, आधारकार्डसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

भिवंडीतून ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक; बनावट पासपोर्ट, आधारकार्डसह ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

भिवंडीतून ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक, बनावट पासपोर्ट, आधारकार्ड जप्त

भारतात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांचा शोध सुरु असतानाच भिवंडीमधून जवळपास ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व बांग्लादेशी घुसखोर बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड बाळगत पैसा कमवण्यासाठी भारतात आले होते. त्यांच्याकडून २८ मोबाईल, बनावट पॅनकार्ड, आधारकार्ड, पासपोर्टसह एकूण ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भिवंडी शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्याचे आदेश भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिले होते. या आदेशानंतर शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलीस ठाणे अशा तीन पोलीस ठाण्याच्या पोलिसांची तीन वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली. या पथकांनी भिवंडी शहरात घुसखोरी करुन राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांच्या ठिकाणांवर छापेमारी करत ४० बांग्लादेशी नागरिकांना बेड्या ठोकल्या. यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. तर नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० आणि भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १० अशा एकूण ४० बांग्लादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या या सर्व आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आले यावेळी कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हे सर्व बांग्लादेशी नागरिक भिवंडी शहरातील वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये बनावट भारतीय कागदपत्रांच्या आधारे काम करत होते.

पासपोर्ट तसेच व्हिसा नसतानाही हे बांग्लादेशी नागरिक छुप्या मार्गाने भारतात घुसले. हे सर्व आरोपी बांग्लादेशात वास्तव्यास असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांसोबत इमो अॅपच्या माध्यमातून बोलत होते. भारतात पैसा कमावण्याच्या उद्देशाने ते विविध ठिकाणी मजुरीचे काम करत होते अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली. भिवंडी पोलिसांकडून आत्ता भारतात अवैध्य मार्गाने येणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना मदत करणारे किंवा आणणारे एन्जट कोण आहेत तसेच बनावट कागदपत्रं बनवून देणाऱ्या आरोपींचा शोध सुरु आहे.

यापूर्वी कोनगावं पोलिसांच्या गुन्हे शाखेने नऊ बांगलादेशी नागरिकांना सरवली एमआयडीसी क्षेत्रातून अटक केली होती. त्यामुळे भिवंडीत अवैध्यरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी घुसखोरांचा भिवंडी पोलीस कसून शोध घेत आहेत.


 

First Published on: December 1, 2021 11:51 AM
Exit mobile version