सीएची रेल्वेखाली आत्महत्या; आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होती चौकशी

सीएची रेल्वेखाली आत्महत्या; आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होती चौकशी

आत्महत्या

काही दिवसांपासून ठाण्यातून बेपत्ता असलेले एका बड्या कंपनीचे सीए (चार्डट अकाऊंट) सागर देशपांडे यांचा मृतदेह टिटवाळा येथील रेल्वे रुळाजवळ मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सागर देशपांडे यांची एका प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती अशी माहीती कल्याण रेल्वे पोलिसांनी दिली. सागर देशपांडे यांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली असून या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सागर देशपांडे हे ठाण्यातील नौपाडा परिसरात कुटुंबियांसह राहण्यास होते. एका बड्या कंपनीत सीए म्हणून काम करणारे सागर ११ ऑक्टोबर रोजी टिटवाळा येथे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन बंद झाला तेव्हापासून ते बेपत्ता झाले होते. याप्रकरणी कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

कल्याण रेल्वे पोलिसांना १२ ऑक्टोबर रोजी टिटवाळा रेल्वे स्थानका जवळील रेल्वे रुळजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मिळून आलेला मृतदेह सागर देशपांडे यांचाच असल्याची ओळख शनिवारी पटली. दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर सागर देशपांडे यांची मोटार पोलिसांना मिळाली आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून सागर देशपांडे यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता रेल्वे पोलिसांनी वर्तवली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेत दाखल असलेल्या एका प्रकरणात सागर देशपांडे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती, त्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसानी दिली आहे.


हेही वाचा – फेसबुकवरची पूजा नीघाली शेजारचा बलदेव; हवाई दलाचा अधिकारी फसला हनी ट्रॅपच्या जाळ्यात


 

First Published on: October 17, 2020 8:32 PM
Exit mobile version