Crime News: सैराटसारखा शेवट! पालममध्ये आई-बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून केला खून

Crime News: सैराटसारखा शेवट! पालममध्ये आई-बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून केला खून

सैराट सारखा शेवट! पालममध्ये आई-बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून केला खून

परभणी: परभणी येथील नाव्हा येथे ऑनर किलिंगचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या आंतरजातीय प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनी भावकीतील अन्य सहा जणांच्या सहाय्याने तिचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट केला. ही घटना 21 ते 22 एप्रिलला घडली. घटना उघडकीस आल्यानंतर आई वडिलांसह 8 जणांवर खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News In Palam Nava the parents killed the daughter and burnt the body due to enter caste marriage)

नाव्हा येथील 19 वर्षीय मुलीचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. पण मुलीचा प्रियकर आंतरजातीय असल्याने त्याच्याशी विवाह करू नये, असा दबाव टाकत मुलीच्या आई वडिलांनी विरोध केला. तरीही मुलगी प्रियकरासोबत आंतरजातीय विवाह करण्यावर ठाम होती. त्यामुळे घरात झोपलेल्या मुलीची 21 एप्रिल रोजी रात्री गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कोणालाही थांगपत्ता लागणार नाही, यासाठी रात्री भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीत मृत मुलीचे प्रेत जाळून टाकत पुरावा नष्ट करण्यात आला.

आरोपींची नावं

वडील बाळासाहेब भिमराव बाबर, आई रुक्मिणीबाई बाळासाहेब बाबर, अच्युत दत्तराव बाबर, राजेभाउ रखमाजी बाबर, अशोक रुस्तुमराव बाबर, आबासाहेब रुस्तुमराव बाबर, गंगाधर योगाजी बाबर, गोपाळ अशोक शिंदे, अशी संशयित आरोपींची नावं आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, साक्षी बाळासाहेब बाबर हिचे गावातील दुसऱ्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे साक्षीने आंतरजातीय विवाह करु नये, असं मत तिच्या आई-वडिलांचे होते. परंतु, साक्षी त्या मुलासोबतच लग्न करण्यावर ठाम होती. त्यामुळे 21 एप्रिल रोजी रात्री 10 ते 22 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान नाव्हा येथे तरुणीच्या आई-वडिलांनी तिला ठार केले.

अन् मुलीचा मृतदेह स्मशानात जाळून टाकला

साक्षीला जीवे मारल्यानंतर त्यांनी रात्री कोणालाही माहिती होऊ न देता भावकीतील निवडक लोकांना त्यांनी समवेत घेऊन संगनमत केलं. मुलीचा मृतदेह नाव्हा येथील स्मशानभूमीत जाळून तो पुरावा नष्ट केला. त्या मुलीचा अंत्यविधी नातेवाईक करत असताना अनेकजण तेथे हजर होते. पण त्यांना या अपराधाची माहिती असतानाही त्या लोकांनी पोलिसांना याबाबत न कळवता सदर अपराधास मदत केल्याने पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरून 8 जणांवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा सध्या पुढील तपास सुरू असून उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

First Published on: May 5, 2024 12:26 PM
Exit mobile version