Crime News: विवाहित महिलेची आत्महत्या; पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

Crime News: विवाहित महिलेची आत्महत्या; पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ करुन पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. गोरक्षनाथ भगवान भोजणे, असे या आरोपी पतीचे नाव असून या गुन्ह्यांत त्याचे वडील भगवान दिनभाऊ भोजणे, आई मंदा भगवान भोजणे आणि बहिण स्नेहा भगवान भोजणे असे तिघेजण सहआरोपी आहेत. (Crime News in Vikhroli married woman Suicide case filed against the husband and in laws)

कुटुंबातील या चौघांंच्या छळाला कंटाळून वैष्णवी गोरक्षनाथ भोजणे या महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. वैष्णवी ही विक्रोळी येथे तिच्या सासरच्या मंडळींसोबत राहत होती. तिचे गोरक्षनाथसोबत डिसेंबर 2022 रोजी पुण्यात दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह केला होता. विवाहाच्या सहा महिन्यानंतर भोजणे कुटुंबिय तिचा हुंड्यासाठी मानसिक व शारीरीक शोषण करत होते. तिने माहेरहून फ्लॅटसह दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैसे आणावेत, म्हणून तिचा ते सर्वजण छळ करत होते.

काही दिवसांपूर्वी तिच्या पतीने तिचा गर्भपात केला होता. तेव्हापासून तिची प्रकृती प्रचंड बिघडली होती. त्यातून आलेल्या मानसिक नैराश्यातून रविवारी 21 एप्रिल 2024 रोजी वैष्णवीने तिच्या विक्रोळीतील राहत्या घरी आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या आत्महत्येचे वृत्त समजताच तिच्या कुटुंबियांनी मुंबईत धाव घेतली होती. या घटनेनंतर तिची आई कविता रामदास बुळे हिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत तिने तिच्या मुलीचा पैशांसाठी सासरच्या मंडळीनी मानसिक व शारीरिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन तिचा गर्भपात करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी पती गोरक्षनाथ भोजणे याला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

(हेही वाचा: Crime News: धक्कादायक! दोन विद्यार्थ्यांची प्राध्यापकाला रॉडने मारहाण; गुन्हा दाखल)


Edited By- Prajakta Parab

First Published on: April 26, 2024 10:01 PM
Exit mobile version