मुलाची सोशल मीडियावरील दादागिरी जीवावर बेतली; वडिलांची घरात घुसून हत्या

मुलाची सोशल मीडियावरील दादागिरी जीवावर बेतली; वडिलांची घरात घुसून हत्या

नागपूरमधील पांढराबोडी परिसरात एका व्यक्तीची घरात घुसून हत्या करण्यात आली. या हत्येच्या कारण जाणून सर्वांना धक्का बसला. अशोक नहारकर (४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीचा मुलगा रितेश नहारकरचा सोशल मीडियावर गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपीसोबत वाद झाला. वादाचा सूड घेण्यासाठी आरोपी रितेश नहारकरला मारण्यासाठी त्याच्या घरी जाऊन त्याच्यावर हल्ला केला. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी मध्ये आलेल्या अशोक नहारकर यांची हत्या करण्यात आली.

रविवारी रात्री अकराच्या सुमारास नहारकर कुटुंबीय झोपण्याची तयारी करत असताना अचानक त्यांच्या घरावर काही जणांनी दगड, विटा, चाकू आणि लोखंडी रॉड घेऊन हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने काय करावं हे सुचण्याच्या आधीच हल्लेखोर त्यांच्या घराचं दार तोडून आत शिरले आणि त्यांनी रितेश नहारकर याच्यावर हल्ला चढवला. या दरम्यान, हल्ला चढवण्याच्या मुलाला वाचवण्यासाठी रितेशचे वडील अशोक मधे आल्याने हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत चाकू आणि दगडांनी त्यांच्या घराच्या आतच कुटुंबियांच्या समोर हत्या केली.

रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत असलेल्या अशोक नहारकर यांना उचलून कुटुंबियांनी जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुग्णालयाच्या दारावर पुन्हा हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांच्या तावडीतून सूटून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. तोपर्यंत अशोक नहारकर यांनी प्राण सोडले होते. सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधातली शेरेबाजी आणि दादागिरीच्या उद्दिष्टाने एकमेकांना पाहून घेण्याची आणि धमकी देण्यावरुन हा हल्ला करण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावरील एका तरुणाचे मेसेज आणि त्यावरून गुंड वृत्तीच्या आरोपींसोबत झालेले भांडण वडिलांच्या जीवावर बेतलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात चेतन महतो, रामू महतो आणि मुन्ना महतो या तीन आरोपींना अटक केली आहे. महतो कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

First Published on: October 6, 2020 12:48 PM
Exit mobile version