Salman Khan House Firing Case : आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

Salman Khan House Firing Case : आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : बॉलिवूडमधील सिनेअभिनेता सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर काही वेळापूर्वी समोर आली होती. यानंतर आता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. अनुज थापन असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. (Salman Khan House Firing Case Accused Anuj Thapan attempted suicide died during treatment)

मिळालेल्या माहितीनुसार, अनुज थापन असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना बंदूक देणाऱ्या दोघांना पोलिसांनी पंजाबमधून मुंबईत आणले होते. सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन अशी अटक आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना मुंबई पोलीस मुख्यालयातील गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी अनुज थापनने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र आता त्याच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे.

अनुज थापन हा ट्रकवर हेल्पर म्हणून काम करतो. तर सुभाष शेतीची कामे करतात. अनुजवर यापूर्वीच गुन्हे दाखल असून लॉरेन्स विश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांनी 15 मार्च रोजी पनवेलमध्ये दोन पिस्तुलांची डिलिव्हरी केली होती. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई गुन्हे शाखेने गोळीबार करणाऱ्यांना बंदूक देणाऱ्या पंजाबमधील दोघांना अटक केली होती. दोघांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सुरतमधील तापी नदीतून दोन पिस्तूल, 4 मॅगझिन आणि 17 काडतुसे जप्त केली आहेत. सध्या पोलीस सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास करत असताना हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, लॉरेन्स बिश्नोई टोळीला भारताबाहेर कार्यरत असलेल्या देशद्रोही घटकांकडून पैशांच्या स्वरूपात किंवा शस्त्रास्त्रांच्या रूपात काही मदत मिळाली आहे की नाही.

गोळीबार प्रकरणी चार जणांना अटक (Four persons were arrested in connection with the firing)

दरम्यान, 14 एप्रिल रोजी पहाटे वांद्रे परिसरातील सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन जणांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई हे या प्रकरणात प्रमुख आरोपी आहेत. अनमोल सध्या अमेरिका किंवा कॅनडामध्ये असल्याचे समजते. अनमोलने फेसबुक पोस्टद्वारे गोळीबार प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्याचा आयपी ॲड्रेस पोर्तुगालचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Edited By – Rohit Patil

First Published on: May 1, 2024 2:52 PM
Exit mobile version