आमदार साहेबांच्या नावाखाली ठाण्यात वृद्धांची फसवणूक

आमदार साहेबांच्या नावाखाली ठाण्यात वृद्धांची फसवणूक

मुलगा झाला म्हणून शेठजी महिलांना साड्या वाटत आहेत, असे सर्रासपणे सांगून वृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी आता शेठजींच्या जागी आमदार साहेब हा शब्द वापरण्यास सुरुवात केली आहे. आमदार साहेब साड्या, धान्य आणि किराणा वाटत असल्याचे सांगून या भामट्यांनी वृद्ध महिलांची फसवणूक करण्याचा नवीन मार्ग शोधला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय पार्क येथे मंगळवारी एका ६० वर्षीय महिलेला आमदाराचे नाव सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात या भामट्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारच्या वेळी एकट्या-दुकट्या वृद्ध महिलांना रस्त्यात गाठून त्यांना कपडे, साड्यांचे आमिष दाखवत शेठजींना मुलगा झाला आहे, आमचे शेठजी दानशूर असून ते वृद्ध आणि गरीब महिलांना मदत करतात असे सांगून हे भामटे वृद्धाच्या अंगावरील दागिने काढून घेऊन पसार होत होते. शेठजी हा शब्द ऐकून वृद्ध महिला जाळ्यात अडकत नसल्यामुळे या भामट्यांनी ‘आमदार साहेब’ या शब्दाचा प्रयोग सुरु केला.

ठाण्यातील कासारवडवली येथे राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेला मंगळवारी दोन तरुणांनी रस्त्यात थांबवले. आमदार साहेब आले असून ते वृद्ध महिलांना आणि गरिबांना मोफत कपडे, धान्य, रोख रक्कम वाटत आहेत, असे सांगून या वृद्ध महिलेला एका निर्जन स्थळी घेऊन गेले. त्यानंतर वृद्ध महिलेला अंगावरील दागिने काढून ठेवा अन्यथा तुम्ही गरीब नाही वाटणार असे सांगून हे दोघे हातचलाखी करत या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि मोबाईल फोन घेऊन पसार झाले. वृद्ध महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दोन भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

 

First Published on: January 6, 2021 10:58 PM
Exit mobile version