Crime : मालाड येथे गटाराची सफाई करताना कामगारांचा मृत्यू; सुपरवायझरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Crime : मालाड येथे गटाराची सफाई करताना कामगारांचा मृत्यू; सुपरवायझरसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : मालाड येथे गटाराचे सफाईचे काम करताना कामगारांना सुरक्षेचे कुठेही साधन न पुरविल्याने दोन कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी सुपरवायझरसह इतर तिघांविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. मनोहरन सुब्रमण्यम नाडर याच्यासह सोसायटीच्या संबंधित तिघांचा या आरोपींमध्ये समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून लवकरच संबंधित चारही आरोपींची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. (Workers die while cleaning drains in Malad)

हुसैन मेंहदी हसन शेख हा तरुण त्याच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या कुरार व्हिलेज, शांतीनगर चाळीत राहतो. तो बागकाम करतो, तर इतर चारपैकी दोन भाऊ जावेद आणि अकीफ हे रिक्षाचालक, तर दोन भाऊ सलीम आणि इम्रान हे बिगारी कामगार म्हणून कामाला आहे. बुधवारी दुपारी तीन वाजता मालाड येथील रत्नागिरी हॉटेलजवळील रहेजा हाईट्स आणि रहेजा रेसीडेन्सी डांबर कंपनीसमोरील गटार चेंबर साफसफाईचे काम सुरू होते. यावेळी सफाई करताना ऑक्सिजन कमी झाल्याने तीनजण बेशुद्ध झाले होते.

हेही वाचा – Crime News : ऍण्टॉप हिल परिसरात अल्पवयीन भावा-बहिणीचा मतदेह कारमध्ये सापडला

ही माहिती समजताच दिडोंशी पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तिथे धाव घेऊन गटारात बेशुद्ध पडलेल्या तिघांनाही बाहेर काढले होते. त्यांना तातडीने जवळच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याचा भाऊ जावेद मेहंदी हसन शेख (39) आणि त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या रघु गोविंद सोलंकी (68) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अकीफ मेहंदी हसन शेख (20) याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हुसैन शेख याच्या तक्रारीवरून दिडोंशी पोलिसांनी प्लंबर सुपरवायझर मनेाहरन नाडर आणि रहेजा इमारतीच्या संबंधित इतर तिघांविरुद्ध गटाराचे काम करताना कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य ती काळजी न घेणे, सुरक्षेचे कोणतेही साधन न पुरविता त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.


रिक्षाचालकाविरुद्ध वाहतूक पोलिसांची धडक मोहीम

मुंबई : रिक्षाचालकाविरुद्ध मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम हाती घेऊन गेल्या काही दिवसांत 52 हजार 189 रिक्षाचालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नजीकचे भाडे नाकारणे, गणवेश परिधान न करणे, बॅच आणि इतर कागदपत्रे न बाळगणे या कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

विविध रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानकासह इतर ठिकाणी रिक्षाचालक लांबपल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी बर्‍याच वेळा नजीकचे भाडे नाकारतात. त्यावरून रिक्षाचालक आणि ग्राहकांमध्ये अनेकदा शाब्दिक खटके उडत असतात. गेल्या काही दिवसांत अशा रिक्षाचालकामुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे अनेक ग्राहकांची वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. या वाढत्या तकारीनंतर वाहतूक पोलिसांनी अशा रिक्षाचालकाविरुद्ध मोहीम हाती घेतली होती.

हेही वाचा – ५० हजारांची लाच घेताना लाचखोर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारेला अटक; जमावाची दगडफेक

8 एप्रिल ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत या मोहीमेतर्गत वाहतूक पोलिसांनी 52 हजार 189 रिक्षाचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यात 32 हजार 658 रिक्षाचालकांविरुद्ध भाडे नाकारणे, 5 हजार 268 रिक्षचालकांविरुद्ध विना गणवेश, 8 हजार 650 रिक्षाचालकांविरुद्ध जादा प्रवासी वाहतूक करणे, तसेच इतर कलमांतर्गत 5 हजार 613 रिक्षचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या सर्वाविरुद्ध ई-चलनाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Edited By – Rohit Patil

First Published on: April 25, 2024 9:36 PM
Exit mobile version