अमेरिकेत कोरोनाने लहान मुलांना श्वसनाचे त्रास, आठवड्यातच १ लाखांहून अधिक मुलांना संसर्ग

अमेरिकेत कोरोनाने लहान मुलांना श्वसनाचे त्रास, आठवड्यातच १ लाखांहून अधिक मुलांना संसर्ग

गेल्या दीड वर्षांपासून देशासह जगभरात कोरोनाने कहर केल्याचे पाहायला मिळत आहे. संपूर्ण एक वर्ष उलटून गेलं असताना देखील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. दरम्यान अमेरिकेतून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेत कोरोनाच्या विळख्यात लहान मुलं सापडली असून अमेरिकेच्या ३४ राज्यांतील मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. यामुळे तेथील रुग्णालयात आजारी मुलांची उपचारांसाठी गर्दी दिसत आहेत. या मुलांचे वय २ महिने ते १२ वर्षे आहे. मात्र, अशा बालकांसाठी अनेक रुग्णालयांना उपचार देणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत या लहान मुलांना कोरोनाशी एकट्याने लढणं कठीण होत आहे. कोरोनामुळे ते आपल्या पालकांपासून दूर आहेत आणि चिंताजनक म्हणजे कोरोनामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. अशी गंभीर परिस्थिती असणाऱ्या मुलांना ऑक्सिजन दिला जात असून सध्या सध्या अनेक मुले व्हेंटिलेटरवर आहेत.

आठवड्याभरात १ लाख ८० मुलांना बाधा

या लहान मुलांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर देखील दिवसरात्र काम करत आहे. मुलांच्या देखरेखीमध्ये गुंतलेले डॉक्टर आणि परिचारिका यांना आठवडाभर सुट्टीही घेता येत नसून हॉस्पिटलने त्यांना दुप्पट रक्कम देण्यास भाग पाडले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या ७ दिवसात १ लाख ८० हजार मुलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर देशातील १ लाख मुलांपैकी ६ हजार १०० मुलांना संसर्ग होत आहे. संसर्ग होणारी मुलं अशा राज्यांतील आहे जिथे लस उपलब्ध झालेली नाही.

ऑगस्ट महिन्यापूर्वी राज्यात चार दिवसात ३ हजार मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. पण आता हा आकडा ४ पटीने वाढला आहे. टेनेसी आणि टेक्सासमधील रूग्णालयातील आयसीयू विभाग पूर्णपणे लहान मुलांनी भरले आहेत. कॅलिफोर्निया, न्यूयॉर्कमध्येही लहान मुलांची प्रकरणे वाढत असून या जीवघेण्या महामारीमुळे आतापर्यंत ४०० मुलांचा मृत्यू झाला आहे, असे लुईझियानाचे गव्हर्नर जॉन बेल एडवर्ड्स यांनी सांगितले आहे. ८ महिन्यांनंतर अमेरिकेत एकाच दिवसात जास्तीत जास्त १.९० लाख नवीन रुग्ण सापडले आहेत तर २४ तासांमध्ये १३०० पेक्षा जास्त मृत्यू झाले असून जे जगातील सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३.९५ कोटी रुग्ण सापडले आहेत. यापैकी १४ टक्के केवळ लहान मुले आहेत.


 

First Published on: August 30, 2021 7:58 AM
Exit mobile version