प्रेरणादायी: हात नसूनही तिने मिळवला सुंदर हस्ताक्षराचा पुरस्कार

प्रेरणादायी: हात नसूनही तिने मिळवला सुंदर हस्ताक्षराचा पुरस्कार

सारा हिनेस्ली

‘प्रयत्ने वाळूचे कणही रगडिता तेलही गळे’, ही म्हण सारा हिनेस्लीसाठी अगदी समर्पक ठरली आहे. सारा हिनेस्ली या दहा वर्षीय चिमुकलीने अशक्य असणारी गोष्ट सिद्ध करुन दाखवली आहे. साराला जन्मापासून हात नव्हते. परंतु, तरिही तिने अमेरिकेच्या राष्ट्रीय सुंदर हस्ताक्षराच्या स्पर्धेत भाग घेत प्रथम बक्षिस पटकावले. त्यामुळे जगभरात साराचे कौतुक होत आहे. आयुष्यात अपयश आले म्हणून बरेच तरुण-तरुणी आत्महत्या करताना दिसतात.

मात्र, या दहा वर्षाच्या चिमुकलीने परिस्थितीला झुंज देत संघर्ष करण्याचा संदेश आपल्या कर्तृत्त्वातून दिला आहे. साराला मिळालेल्या पुरस्कारामुळे जगभराच तिचं कौतुक केलं जात आहे. सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे.

‘अशी’ आहे साराची कहानी

सारा ही अमेरिकेच्या मेरीलँड राज्याच्या फ्रेडरिक शहरात वास्तव्यास आहे. ती जन्मत: दिव्यांग आहे. तिला जन्मापासून हात नाहीत. परंतु, शिक्षणासाठी लेखन महत्त्वाचं आहे. शिक्षणात वाचना सोबतच लेखनाची गोडी असावी लागते. परंतु, साराला हात नसल्यामुळे ती लिहू शकेल, अशी कल्पनाही करता येणार नाही. परंतु, साराने आपल्या दिव्यांगावर मात करत लिहिण्याचं ठरवलं. जुलै २०१५ मध्ये ती चीन येथून अमेरिकेत आली. त्यावेळी ती मंडारी भाषेत लिहायची. त्यानंतर तिने इंग्रजीत लिखाण करण्याचा निर्णय घेतला. साराच्या कुटुंबियांनी तिच्यावर विश्वास ठेवला. अखेर सारा इंग्रजीमध्ये देखील लिहू लागली.

आज ती सुंदर हस्ताक्षरात लिहू शकते. याशिवाय तिला चित्रकलाही आवडते. ती फ्रेडरिक मधील सेंट जॉन्स रीजनल कॅथोलिक स्कूलमध्ये इयत्ता ३ री मध्ये शिकत आहे. तिने अमेरिकेच्या राष्ट्रीय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. १३ जून रोजी तिला अमेरिकेत हस्ताक्षराचा राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप ट्रॉफी आणि ५०० डॉलर्स असं असणार आहे.

First Published on: April 24, 2019 10:20 AM
Exit mobile version