पाकिस्तानी दुतावासातून २३ भारतीय पासपोर्ट झाले गायब

पाकिस्तानी दुतावासातून २३ भारतीय पासपोर्ट झाले गायब

पाकिस्तानमधील दुतावासातून एक २३ भारतीय पासपोर्ट गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, याप्रकरणी भारतातील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, दुतावास कार्यालयातून हरवलेले सर्व (२३) पासपोर्ट शीख भाविकांचे आहेत. गेल्या महिन्यात यात्रेसाठी हे शीख भाविक पाकिस्तानात गेले होते. दरम्यान, पासपोर्ट गहाळ झालेल्या या भाविकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाला घटनेची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने गहाळ झालेले हे सर्व पासपोर्ट रद्द करण्याची तयारी सुरु केली आहे. याशिवाय हे प्रकरण पाकिस्तानच्या उच्चायुक्तांसमोरही मांडले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. २१ ते ३० नोव्हेंबर या काळात पाकिस्तानकडून ३, ८०० शीख भाविकांना व्हिसा मंजूर करण्यात आला होता. हे सर्व व्हिसा गुरुनानक यांच्या ५४९ व्या जयंतीनिमित्त जारी करण्यात आले होते. एकूण ३, ८०० पैकी २३ जणांनी पोलिसांकडे पासपोर्ट हरवल्याची तक्रार दिली आहे. मात्र, पाकिस्तानने या प्रकरणात त्यांच्या अधिकाऱ्यांचा हात नसल्याचे सांगितले आहे.

 


वाचा : प्रोजेक्ट बुलेट ट्रेन वेगात; बडोद्यात २० ट्रॅक दाखल

 

पासपोर्टचा गैरवापर होऊ नये…

शिख बांधवांकडून दिल्लीच्या एका एजंटने हे पासपोर्ट घेतले होते. व्हिसासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे कागदपत्र सादर करण्यासाठी पासपोर्ट हवे असल्याचे त्याने सांगितले होते. ठरल्याप्रमाणे हे सर्व पासपोर्ट आणि अन्य कागदपत्रे पाकिस्तानच्या दुतावासात जमा केल्याची कबुली त्या एजंटने पोलिसांना दिली. मात्र, ज्यावेळी तो पासपोर्ट परत घेण्यासाठी पाकिस्तानी दुतावासाच्या कार्यालयात गेला, तेव्हा ते पासपोर्ट आणि कागदपत्रं गायब झाल्याचा प्रकार समोर आला. एजंटने दिलेले पासपोर्ट आणि कागदपत्रं मिळालीच नाही, असं दुतावासातील कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा दावा एजंटने केला आहे. दरम्यान, याप्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घपरराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे. ‘हा गंभीर प्रकार असून पासपोर्टचा गैरवापर होऊ नये, यावर आमचा भर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

First Published on: December 15, 2018 10:48 AM
Exit mobile version