दिल्ली : अनाज मंडी येथे भीषण आग; ४३ जणांचा मृत्यू

दिल्ली : अनाज मंडी येथे भीषण आग; ४३ जणांचा मृत्यू

दिल्लीच्या राणी झांशी रोडवरील अनाज मंडी येथे आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुले ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत होरपळून ४३ जणांचा मृत्यू झाला. तर ५० पेक्षा जास्त जण या आगीत जखमी झाले. या आगीत अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आले. या आगीबद्दल माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या २७ गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून बचाव कार्य सुरु आहे.

दिल्लीच्या अनाज मांडी परिसरात एका तीन मजली बेकरीच्या वरच्या मजल्यावर अचानक आग लागली. ही आग सकाळी पाच वाजेच्या सुमारास लागली. आग संपूर्ण इमारतीत पसरली. याशिवाय आगीमुळे धुराचे लोळ संपूर्ण इमारतीत पसरले. त्यामुळे धुरामध्ये अनेक जण गुदमरले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे बचावकार्यात अडथडे येत होते. मात्र, सर्व अडचणींना दूर सारत अग्नीशमन दलाने ५६ लोकांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढले. मात्र, यात ३५ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शोक व्यक्त केला आहे. ‘ही एक अत्यंत दु:खद घटना आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत’, असे केजरीवाल म्हणाले आहेत.

या आगीत मृत्यू झालेल्यांचा कुटुंबियांना केंद्र सरकारकडून दोन लाखांची मदत जाहीर झाली आहे, तर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे. याशिवाय दिल्ली सरकारने देखील आगीत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

First Published on: December 8, 2019 9:51 AM
Exit mobile version