भारतातल्या ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचू शकलेला नाही!

भारतातल्या ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोना पोहोचू शकलेला नाही!

देशात कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ लागला असून त्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला २१ दिवसांचा असलेला लॉकडाऊन देशभरात ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. २० तारखेनंतर हॉटस्पॉट नसलेल्या भागांमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल करण्यात आले असले, तरी देखील लॉकडाऊन कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी जाहीर केलेली नवी आकडेवारी देशवासीयांसाठी दिलासादायक ठरली आहे. देशात तब्बल ४०० जिल्हे असे आहेत की जिथे कोरोना अजून पोहोचू शकलेला नाही, असं त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधलेल्या संवादात नमूद केलं. मात्र, असं सांगतानाच पुढचे २ ते ३ आठवडे देशासाठी महत्त्वाचे आहेत, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

‘भारतात अजूनही ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे आता कोरोना नक्की कुठे कुठे पसरलेला आहे, ते आम्ही अचूकपणे शोधून काढू शकलो आहोत. या पार्श्वभूमीवर कोरोनाला पिटाळून लावण्यासाठी पुढचे २ ते ३ आठवडे फारच महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषत: भारतासाठी हे महत्त्वाचं आहे’, असं ते म्हणाले. तसेच, ‘चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर सर्वात आधी प्रतिसाद देऊन कार्यवाही करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. ७ जानेवारीला चीनमध्ये हा रुग्ण सापडला होता’, असं देखील केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य विभागाने संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देखील याविषयी काही आकडेवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये देशात कोरोनाच्या हॉटस्पॉट श्रेणीत येणारे एकूण १७० जिल्हे आहेत असं जाहीर करण्यात आलं. त्याशिवाय २०७ जिल्हे असे आहेत की जिथे कोरोनाचा फैलाव जरी नसला तरी काही प्रमाणात कोरोनाच्या केसेस पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये देखील कोरोनापासून बचावासाठीच्या उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

First Published on: April 15, 2020 11:38 PM
Exit mobile version