भारत-चीन चकमकीनंतर भारताचे ७६ सैनिक रुग्णालयात दाखल

भारत-चीन चकमकीनंतर भारताचे ७६ सैनिक रुग्णालयात दाखल

लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारत-चीन चकमकीसंदर्भातील मोठी बातमी समोर येत आहे. गलवान खोऱ्यातील चकमकीत सुमारे ७६ जवान जखमी झाले असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमीतील कोणत्याही जवानाची प्रकृती चिंताजनक नाही. १५ दिवसांत सैनिक सीमेचं रक्षण करण्यास सज्ज होतील. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

लेह मधील रुग्णालयात १८ सैनिकांना दाखल करण्यात आलं आहे. तर इतर रुग्णालयात ५८ सैनिकांना दाखल करण्यात आलं असून जवान किरकोळ जखमी आहेत. ते एका आठवड्यात सीमेचं रक्षण करण्यास सज्ज होतील. दरम्यान, पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या सैनिकांशी हिंसक चकमकीत सहभागी असलेला कोणताही भारतीय जवान गायब नाही आहे, असं भारतीय लष्कराने सांगितलं यापूर्वीच सांगितलं होतं. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली, त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या चकमकीनंतर सोमवारी रात्रीपासून १० भारतीय सैनिक बेपत्ता झाल्याचं वृत्त होतं.

या चकमकीत ४३ चिनी सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री भारतीय लष्कराच्या सैनिकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सैनिकांकडे शस्त्रे होती, पण त्यांनी चिनी सैनिकांवर गोळीबार केला नाही, असं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, तणाव कमी करण्यासाठी गुरुवारी गलवान खोऱ्यामधील पेट्रोल पॉईंट नंबर-१४ येथे मेजर जनरल स्तरावर चर्चा होत आहे.

 

First Published on: June 19, 2020 8:03 AM
Exit mobile version